Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Nashik › ‘विंचूर-प्रकाशा’ आता राष्ट्रीय महामार्ग

‘विंचूर-प्रकाशा’ आता राष्ट्रीय महामार्ग

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 05 2018 12:29AMसटाणा : वार्ताहर

शहरातून जाणार्‍या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेला पाठपुरावा सत्कारणी लागला असून, केंद्र शासनाने नुकतीच त्यास मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपयांची आर्थिक तरतूददेखील करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. मध्य प्रदेशातील खेतीयापासून शहादा, साक्री, पिंपळनेर, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी ते कर्नाटकातील चिकोडीपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, राष्ट्रीय महामार्ग ‘756-जी’ या क्रमांकाने हा राष्ट्रीय महामार्ग ओळखला जाणार आहे. या महामार्गाची लांबी 195 किमी असून, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन दोन राज्यांना हा महामार्ग जोडला जाणार आहे.

गुजरात राज्याला अत्यंत जवळचा महामार्ग असल्याने गेल्या अनेक वर्षापासून शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड  वाहतूक या रस्त्यावर केली जाते. याच रस्त्यावर असंख्य अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. साक्री ते पिंपळनेर 21.42 किमी रस्त्यासाठी 100 कोटी, पिंपळनेर ते सटाणा या 42.57 किमीच्या रस्त्यासाठी 198 कोटी तर सटाणा-मंगळूर 37.14 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 200 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या सर्व कामांची निविदा निघाली असून, पुढील दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.सटाणा शहराच्या हद्दीपासून कंधाणा फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण होणार असून, नवीन दुभाजक टाकण्यात येणार आहेत. तसेच, जड वाहतुकीला आळा बसण्यासाठी शहराच्या पूर्व व पश्‍चिम बाजूकडून वळणरस्ता लवकरात लवकर तयार होण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे नागरीकांची अनेक वर्षापासूनची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.