Thu, Apr 25, 2019 08:09होमपेज › Nashik › सेवक भरती तत्काळ थांबवा

सेवक भरती तत्काळ थांबवा

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 05 2018 12:24AMसटाणा : वार्ताहर

बागलाण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सेवक भरती तत्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. प्रसिध्द जाहिरातीनुसार होणारी सेवक भरती थांबविण्यासाठी शहर चिटणीस मंगेश भामरे यांनी संचालक मंडळाला निवेदन दिले असून, निवेदनाच्या प्रती राज्य पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, सहायक उपनिबंधक यांना देण्यात आल्या आहेत.
चुकीच्या पद्धतीने भरती झाल्यास तीव्र आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल आणि त्याची जबाबदारी समितीची असेल असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे 2 तारखेला वर्तमानपत्रात सेवक भरतीबाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.

जाहिरातीमधील नऊ पदांसाठी जातीच्या प्रवर्गांसाठी आक्षेपार्ह प्रवर्ग निवडण्यात आलेले आहेत. सेवक भरतीची प्रक्रिया अत्यंत चुकीची व बेकायदेशीर पद्धतीने सुरु आहे. तसेच सेवक भरतीच्या पदांमध्ये महिलेस आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे सेवक भरतीची प्रक्रिया तत्काळ स्थगित करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. कोणतीही चुकीची सेवक भरती केल्यास त्याविरुध्द तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी बाजार समितीची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता नामपूर बाजार समितीचे संचालक मंडळ याबाबत काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.