Tue, Jul 23, 2019 02:04होमपेज › Nashik › निर्यातमूल्याचा लगाम सुटताच कांदादर उधळले

निर्यातमूल्याचा लगाम सुटताच कांदादर उधळले

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:27PMसटाणा : सुरेश बच्छाव

ग्राहक, राजकारण आणि मीडियामध्ये संवेदनशील कृषी उत्पादन म्हणून परिचित असलेले कांदा पीक दराबाबतही तेवढेच संवेदनशील आहे. विशेषत्वाने निर्यातीच्या कारणाने कांद्याचे दर प्राधान्याने प्रभावित होतात. चालू सप्ताहात हेच वास्तव अतिशय ठळकपणे सामोरे आले आहे. अडीच-तीन हजाराच्या घरात असलेले कांदा दर निर्यातशुल्काचा लगाम खेचताच हजारावर आले. हेच निर्यातशुल्क काढून घेताच अवघ्या दोनच दिवसांत दरांनी पुन्हा अडीच हजारांचा टप्पा गाठला आहे. साहजिकच निर्यातीचा निर्णय कांद्याबाबत किती संवेदनशील आणि परिणामकारक आहे हेच यातून स्पष्ट झाले.

अर्थात सरासरी उत्पन्‍नात ‘भारी’ असलेल्या रांगडी कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने उत्पादक खुशीत आहेत. खास बाब म्हणजे उन्हाळी कांद्यात पैसा न मिळालेल्या अल्पभूधारक आणि अल्पभांडवलदार शेतकर्‍यांनाच प्रामुख्याने पावसाळी व रांगडी कांद्याने हात दिला आहे. त्यामुळे अनायसेच बाजारपेठेत चैतन्य असून सर्वच धंदे, व्यवसायांना बरकत आल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दशकांनंतर कांद्याचे दर सलग सहा, सात महिने चढे राहिले आहेत. यावर्षी अशी अभूतपूर्व वेळ आली असून, जुलै 2017 पासून कांदा दर सरासरी दोन हजारांच्या आसपास आहेत. अशी वेळ क्‍वचित उद्भवते.गेल्या वर्षी रांगडी कांद्याला नगण्य दर होते.

नवीन उन्हाळी कांद्याचीही तीच गत झाली. सुरुवातीला कांदा सरासरी चारशेने विकला गेला. मात्र, जुलै 2017 नंतर हळूहळू दरांनी चढता आलेख राखत दोन हजारांचा टप्पा कायम ठेवला. चाळीतील उन्हाळी कांदा संपुष्टात आल्यानंतर यावर्षी बाजारात दाखल झालेल्या पावसाळी कांद्याची आवक कमी राहून दरही कायम राहिले. सरासरी अधिक उत्पादित होणारा रांगडी कांदा बाजारात येताच दरवर्षी भाव गडगडतात. यंदा मात्र पंधराशे, दोन हजाराची ‘रेंज’ टिकून राहिल्याने उत्पादकांत समाधान व्यक्‍त होत होते. कांद्याचे दर जास्तीत जास्त 2990, तर सरासरी 2700 रुपयांवर असताना केंद्र शासनाने निर्यात शुल्क वाढविले. त्याची परिणिती तत्काळ दिसून दर गडगडून जास्तीत जास्त 1995, तर सरासरी 1500 वर येऊन ठेपले.

तेच दोन दिवसांत पुन्हा निर्यात शुल्क कमी करण्यात आले आणि दरांनीही पुन्हा तत्काळ तोच टप्पा गाठला. अवघ्या आठच दिवसांत निर्यातशुल्काच्या कारणाने कांद्याच्या दरांतील चढउतार प्रकर्षाने दिसून आले. अर्थात सद्यस्थितीत मिळणारे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारे असल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्‍त होत आहे. शेतकरी वर्गाकडे दोन पैसे आल्याने साहजिकच शहर, तालुक्यातील बाजारपेठेला झळाळी आली आहे. विविध धंदे, व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर आले असून, उन्हाळी कांद्यालाही असेच दर राहिल्यास तालुक्यातील आर्थिक उलाढालीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे.