Fri, Jul 19, 2019 05:09होमपेज › Nashik › सटाणा बाजार समितीसाठी बहुरंगी लढत

सटाणा बाजार समितीसाठी बहुरंगी लढत

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 11:46PMसटाणा : वार्ताहर

येथील कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुकीसाठी माघारीपर्यंत 59 इच्छुकांनी रिंगणातून काढता पाय घेतल्याने पाच जागा बिनविरोध होताना उर्वरित 13 जागांसाठी 39 उमेदवार समोरासमोर ठाकले आहेत. 13 जागांसाठी चार गणांत दुरंगी, तीन गणांत तिरंगी, दोन गणांत चौरंगी, तर एका गणात पंचरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हमाल मापारी गणाची निवड पंचरंगी रंगणार असून, आडते व्यापारी गणातील लढतही चौरंगी होणार आहे. मंगळवारी (दि.15) उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, बुधवार (दि.16)पासून बहुतांश उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रथमच शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर होणार्‍या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष किंवा स्थानिक नेत्यांनी पॅनल निर्मिती करण्याचे टाळले असून, सगळेच उमेदवार स्वतंत्रपणे आपापल्या गणापुरता विचार करण्याच्या मनस्थितीत आहेत. साहजिकच यामुळे सभापती निवडीसाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची भीती आतापासूनच व्यक्‍त होत असून, त्यामुळे मतदारांचा भाव वधारण्याचीही अपेक्षा व्यक्‍त होत आहे. राज्यात प्रथमच नवीन पद्धतीने होणार्‍या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात नामांकन दाखल केले होते.

लखमापूर गणासाठी सात इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अखेर इतर सहाही जणांनी माघार घेतल्याने संजय देवरे बिनविरोध निवडून आले. ब्राह्मणगाव गणातही हाच फॅक्टर कामी आला. येथेे आठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असताना अंतिम क्षणी इतरांनी माघार घेतल्याने नरेंद्र आहिरे बिनविरोध निवडून आले.

1 ठेंगोडा गणात तर इतरांना वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र वा पावती दाखल करता न आल्याने सरदारसिंग जाधव यांची निवड बिनविरोध झाली. पठावेदिगर गणात तुकाराम देशमुख बिनविरोध निवडले असून, वीरगाव गणातही ज्ञानेश्‍वर देवरे यांच्या पत्नी सुनीता या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याव्यतिरिक्‍त उर्वरित 13 जागांसाठी 39 इच्छुकांनी परस्परांविरोधात दंड थोपटले आहेत. 

2 चौगाव गणात तब्बल पाच उमेदवार समोरासमोर भिडणार आहेत. येथेे जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी रौंदळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते केशव मांडवडे, पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम यांचे बंधू सुनील निकम, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अनिल सोनवणे व राजपूत समाजाचे युवा पदाधिकारी राजेंद्र जगताप यांच्यात घमासान होणार आहे.मुंजवाड व खमताणे या गणांत चौरंगी लढत होणार आहे. माजी जि. प. सदस्य, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी सरपंच गणेश जाधव, तरसाळीचे माजी सरपंच प्रभाकर रौंदळ व भास्कर जाधव यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. खमताणे येथील महिला राखीव जागेसाठी शैला गुंजाळ, स्वाती गुंजाळ, जिजाबाई इंगळे व रत्नमाला सूर्यवंशी यांच्यातील लढत रंजक होण्याची चिन्हे आहेत. अजमेर सौंदाणे, सटाणा व कंधाणे येथील तिरंगी लढतीही काट्याच्या ठरण्याची अपेक्षा आहे.

3 अजमेर सौंदाणे येथे प्रकाश देवरे, नानाभाऊ पवार व विजय पवार यांच्यात लढाई होत आहे. बाजार समितीचे मुख्यालय असलेल्या सटाणा गणात सोसायटीचे माजी सभापती माधव सोनवणे, मंगला सोनवणे व माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांच्यातील लढत लक्षवेधी होणार आहे. कंधाणे गणात माजी जि. प. सदस्य प्रा.अनिल पाटील नशीब आजमावणार असून त्यांचेच भाऊबंद संजय बिरारी यांचे आव्हान पेलताना त्यांच्यासमोर चौंधाणेचे माजी सरपंच राकेश मोरे यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. आराई गणात समाधान आहिरे व वेणूबाई माळी यांच्यात, डांगसौंदाणे गणांत माजी जि. प. सदस्या सिंधुबाई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे व रवींद्र सोनवणे या दोघांत, तळवाडे दिगर गणात बाजीराव आहिरे व कपालेश्‍वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्यात, तर वायगाव गणात मच्छिंद्र आहिरे आणि मधुकर देवरे या दोघांत दुरंगी लढत होणार आहे.

4   हमाल मापारी गणातील लढत काट्याची होत आहे. यावेळी एका जागेसाठी भगवान भारती, राहुल देसले, रमेश मोरे, संदीप साळे व रमेश सोनवणे या पाच उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. आडते व्यापारी गणासाठी अशोक बडजाते, किशोर गहिवड, समकोचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे यांच्या पारंपरिक लढतीत शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी उडी घेऊन लढत चुरशीची केली आहे.