होमपेज › Nashik › सरपंच, सदस्यांच्या घरासमोरच अनधिकृत वाळूसाठा

सरपंच, सदस्यांच्या घरासमोरच अनधिकृत वाळूसाठा

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 07 2018 11:54PMमालेगाव : प्रतिनिधी

अवैध वाळू उपशाप्रसंगी मजुराचा मृत्यू होऊन टीकेचे धनी झालेल्या महसूल प्रशासनाने वाळूमाफियांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिवसभर सवंदगाव गाव व शिवारात तपासणी केली. त्यात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि स्वस्त धान्य दुकानदाराच्या घरासमोरच अनधिकृत वाळूसाठा मिळून आला. जवळपास 100 ब्रास वाळू जप्त करत पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सवंदगाव शिवारातून वाहणार्‍या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणार्‍या मजुरावर दगड-मातीचा ढिगारा कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. 3 सप्टेंबर रोजी घडली होती. प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार देवरे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. दरम्यान, या घटनेस प्रशासनाने हेतूपुरस्सर दुर्लक्षच कारणीभूत असल्याचा आरोप होऊ लागला होता. तर प्रशासनाने कारवाईसाठी निघणार्‍या पथकाला सुगावा लागून वाळूमाफिया पसार होतात, अशी भूमिका मांडली होती. असा प्रकार टाळण्यासाठी 24 तास निगराणी पथक नेमण्यात आले. त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी सवंदगावमध्ये शोधमोहीम राबवली. त्यात त्यास सरपंच अरुण शेवाळे व त्यांचे बंधू राजेंद्र शेवाळे यांच्या घरासमोर दीड ब्रास अनधिकृत वाळूसाठा मिळून आला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ग्रामपंचायत सदस्य पोपट काळू शेवाळे यांच्या गट नंबर 81 मध्ये 25 ब्रास वाळू जप्त केली. स्वस्त धान्य दुकानदार गोविंदा शेवाळे यांच्या मालकीच्या शेतखळ्यातून 25 ब्रास वाळूचा अवैधसाठा जप्त केला. त्यांच्यावर पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. पथकाने झोडगे शिवारातदेखील कारवाई केली. मुंबई -आग्रा महामार्गावर दोन ट्रॅक्टर व दोन डंपर पकडले. त्यातील एक ट्रॅक्टर वाळू रिती करून पसार झाला. संबंधितावर पोलीस कारवाई केली जाणार आहे.