Fri, May 24, 2019 03:20होमपेज › Nashik › अखेर पुलावर कठडे बसविण्यास प्रारंभ

अखेर पुलावर कठडे बसविण्यास प्रारंभ

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:17PMसिन्‍नर : प्रतिनिधी

शहरातील संगमनेर नाक्याजवळून वाहणार्‍या सरस्वती आणि देवनदीच्या पुलाला संरक्षण कठड्याच्या दुरवस्थेचे वृत्त दैनिक पुढारीमध्ये देवनदीवरील पुलाला संरक्षक कठडे बसवा या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला खडबडून जाग आली असून, परिसरातील पुलावर लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यास सोमवारपासून (दि.12) सुरुवात झाली आहे.  

शहरातून सिन्‍नर-शिर्डी आणि नाशिक-पुणे असे दोन महामार्ग जातात. त्यामुळे या महामार्गावर नेहमीच मोठी वाहनांची वर्दळ बघावयास मिळते. मात्र, संगमनेर नाका परिसरातून वाहणार्‍या सरस्वती आणि देवनदीवरील पूल वाहतुकीच्या द‍ृष्टिकोनातून धोकादायक बनला होता. पुलाला संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देऊन कठडे बसविण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांनी दोन्ही नद्यांवरील पुलाला लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या आठवडेभरात संरक्षक कठड्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच अपघाताच्या संख्येतही लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.