Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Nashik › रखूमाई-आवलीचे अद्वैत दिल्लीत रविवारी उलगडणार

रखूमाई-आवलीचे अद्वैत दिल्लीत रविवारी उलगडणार

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 11:54PMनाशिक : प्रतिनिधी

साक्षात विठ्ठलाची रखूमाई आणि तुकोबांची आवली या दोन समदु:खी स्त्रियांची वेदना अलवार व तरलपणे मांडणार्‍या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा येत्या रविवारी (दि. 25) नवी दिल्लीतील थिएटर ऑलिम्पिकमध्ये प्रयोग सादर होणार आहे. तर सोमवारी (दि. 26) जगभरातील समीक्षक त्यावर भाष्य करणार आहेत. यानिमित्ताने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. 
येथील प्राजक्त देशमुख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवरही छाप टाकते आहे. या नाटकाची जगातील सर्वांत मोठा नाट्यमहोत्सव असलेल्या थिएटर ऑलिम्पिकसाठी गेल्या डिसेंबरमध्ये निवड झाली होती. वेगवेगळ्या देशांतील नाट्यसंस्कृती समजून घेणे व शिकणे या उद्देशाने दर चार वर्षांनी एका देशात क्रीडा ऑलिम्पिकच्या धर्तीवर थिएटर ऑलिम्पिक भरवले जाते. या महोत्सवाचे यजमानपद यंदा भारताला लाभले असून, तो सांस्कृतिक मंत्रालय व राष्ट्रीय नाट्य विद्यालय यांच्या     वतीने आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाला गेल्या शनिवारी (दि. 17) दिल्ली येथे प्रारंभ झाला. दिल्ली, मुंबईसह देशातील 16 शहरांत तो 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 50 दिवसांच्या या नाट्यजागरासाठी देशभरातून 1,100, तर परदेशातून आलेल्या 100 नाटकांतून 450 नाटकांची निवड करण्यात आली आहे. त्यांत ङ्गसंगीत देवबाभळीफने स्थान पटकावले होते. रखूमाई व आवली यांची योगायोगाने भेट होते व त्यांच्या संवादातून एकमेकींची व पर्यायाने स्त्रीत्वाची व्यथा उलगडत जाते, असे या नाटकाचे कथानक आहे. अनेक समीक्षकांनीही कौतुक केलेल्या या नाटकाचा रविवारी (दि. 25) नवी दिल्ली येथील एलटीजी नाट्यगृहात सायंकाळी 4 वाजता प्रयोग रंगणार आहे. तर दि. 26 रोजी सकाळी समीक्षक या नाटकावर भाष्य करणार आहेत.

दरम्यान, ‘संगीत देवबाभळी’चा 15 कलावंतांचा चमू गुरुवारी (दि. 22) दिल्लीकडे रवाना होणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नाटकाच्या तालमी जोरात सुरू होत्या. नाटकात रसिका नातू व शुभांगी सदावर्ते यांच्या भूमिका आहेत. आनंद ओक यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. नेपथ्य प्रणव प्रभाकर, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा/रंगभूषा पूर्वा सावजी यांची आहे तर वाद्यवृंदात पुष्कराज भागवत, सौरभ कुलकर्णी, अभिषेक दांडेकर, रोहन कानडे, मयूर भालेराव आदींचा समावेश आहे.

थिएटर ऑलिम्पिकमध्ये सादरीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. काहीसे सर्जनशील दडपण आहे खरे; पण आम्ही त्याचा आनंद घेत आहोत. नाटक लिहिले तेव्हा ते दिल्लीपर्यंत धडक मारेल, असे वाटले नव्हते. पण उत्तम काही करण्याचा ध्यास होता. थिएटर ऑलिम्पिकमध्ये येणारे समीक्षक, प्रेक्षक जागतिक रंगभूमीशी निगडित असतात. ते नाटकाचा फॉर्म व अन्य बाबी पाहतात. त्यांना आशयही लक्षात येईल, असे वाटते. 
- प्राजक्त देशमुख, लेखक-दिग्दर्शक

मी मूळ गायिका असून, कधीतरी नाटकात काम करावे, असे वाटत होते. या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच अभिनय केला. रखूमाईची भूमिका साकारणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. त्याला एवढे यश मिळेल, असे वाटले नव्हते. थिएटर ऑलिम्पिकमध्ये सादरीकरण हा मोठा सन्मान आहे. त्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत. 
-  रसिका नातू, अभिनेत्री