Wed, Jan 23, 2019 12:42होमपेज › Nashik › वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:08AMदेवळा : वार्ताहर

तालुक्यातील विठेवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून दिली आहेत. या प्रकरणी देवळा पोलिसांत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार,  लोहोणेर येथून गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर विठेवाडी रस्त्याने जात असताना विठेवाडीच्या ग्रामस्थांना आढळले. ग्रामस्थांनी तातडीने महसूल विभागाचे लोहोणेरचे मंडळ अधिकारी आर. डी. परदेशी व तलाठी नितीन धोडगे यांच्याशी संपर्क साधला. तसेच, देवळा पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. विठेवाडी ग्रामस्थ व संबंधित वाळू तस्कर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. ग्रामस्थांचा उद्रेक पाहून वाळूतस्करांन काढता पाय घेतला. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे घटनास्थळी पोहचल्यानंतर  संबंधित ट्रॅक्टरचे मालक भय्या मिरचा व त्याच्या दोन साथीदारांवर लोहोणेर मंडल अधिकारी आर. डी. परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.

विठेवाडी ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी वसाका कार्यस्थळावर सुमारे 70 ते 80 ट्रॅक्टर अवैध वाळूचा साठा जप्त केला होता. या आठवणी ताज्या असतानाच ही घटना घडल्याने वाळू उपसा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.