Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Nashik › खातेदारांची संख्या ठरतेय ‘समृद्धी’ला अडसर

खातेदारांची संख्या ठरतेय ‘समृद्धी’ला अडसर

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:51AMनाशिक : प्रतिनिधी

एकाच गटात खातेदारांची असलेली अधिक संख्या, जमीन देण्यासाठी खातेदारांची करावी लागणारी मनधरणी तसेच अधिग्रहणावेळी कागदपत्रांची करावी लागणारी पूर्तता ही कारणे समृद्धी प्रकल्पासाठी अडसर ठरत आहेत. या अडचणी बघता शेतकर्‍यांशी संवाद साधून अधिक जलद गतीने अधिग्रहणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आजमितीस इगतपुरीत 50 टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले असताना सिन्नरमध्ये हीच टक्केवारी 58 वर पोहोचली आहे. 

702 किलोमीटरच्या मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पाची नाशिकमधील लांबी 102 किलोमीटर इतकी आहे. इगतपुरी तालुक्यातून हीच लांबी 40 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी तालुक्यातील 493 हेक्टर क्षेत्र लागणार आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे काम संथगतीने सुरू आहे. अधिग्रहीत करण्यात येणार्‍या एकूण क्षेत्रात पाच हजार 300 खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये एका गटात कमीतकमी दोन शेतकरी असून, काही गटात हीच आकडेवारी 10 पेक्षा जास्त आहे. परिणामी, जमीन देण्यासाठी शेतकर्‍यांची संमती मिळविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. तसेच संमती मिळाल्यानंतरही जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकर्‍यांना उपनिबंधक कार्यालयात आणण्यासाठी अधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

इगतपुरी तालुक्यात आजमितीस एकूण क्षेत्रापैकी 227 हेक्टर जमीनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. एक हजार 685 शेतकर्‍यांनी त्यासाठी खरेदी दिली असून, त्यांना नुकसानभरपाईपोटी 227 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, त्या मानाने सिन्नर तालुक्यातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया काहीशी चांगली आहे. तालुक्यातील सद्यस्थितीत 713 पैकी 407 हेक्टर म्हणजेच 57.08 टक्के क्षेत्र प्रशासनाने अधिग्रहीत केले आहे. जमीन दिलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मोबदला म्हणून 421 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.