Mon, May 20, 2019 08:47होमपेज › Nashik › समृद्धी महामार्ग : शिवडे येथे आजपासून पुन्हा जमीन मोजणी

समृद्धी महामार्ग : शिवडे येथे आजपासून पुन्हा जमीन मोजणी

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध करणार्‍या शिवडे ग्रामस्थांमध्येच जमीन देण्याबाबत भिन्न मतप्रवाह निर्माण झाला असून, एका गटाने जमीन देण्यास संमती दर्शविल्याने बुधवारपासून (दि.9) जमिनीची संयुक्‍त मोजणी केली जाणार आहे. काही ग्रामस्थांचा जमीन देण्यास असलेला विरोध पाहता प्रशासनाकडून मोजणीच्या वेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी शिवडे व डुबेरेतील जमीन मोजणीस काही शेतकर्‍यांच्या विरोधामुळे तेथील अधिग्रहणाचे काम रखडले आहे.  परंतु, विरोध करणार्‍या काही शिवडेवासीयांना राजी करण्यास प्रशासनाला यश आले असून, गावातील एका गटाने प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून गावात संयुक्त मोजणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकर्‍यांनी संमती दिली आहे, त्यांच्याच शेतात मोजणीचे काम केले जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी अनूचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा महसूल प्रशासनाच्या दिमतीला असणार आहे. दरम्यान, समृद्धीच्या राज्यस्तरीय आंदोलनाची ठिणगी पडलेल्या शिवडेतच जमीन मोजणीचे काम सुरू होत असल्याने प्रशासनाचे पर्यायाने सरकारचे हे मोठे यश मानले जात आहे. 

राज्यातील दहा जिल्ह्यांमधून 712 किलोमीटरचा समृद्धी प्रकल्प जात आहे. जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून 102 किलोमीटरच्या प्रकल्पाचे अंतर आहे. दरम्यान, प्रकल्प जाहीर होताच तालुक्यातील शिवडे आणि पंचक्रोशीतील गावांसह इगतपुरी तालुक्यातून यास विरोध आहे. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी थेट आंदोलनच पुकारले. त्याची धग राज्यभर पोहोचली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात सरकार व स्थानिक प्रशासनाने प्रकल्पबाधित शेतकर्‍यांची मने वळवितानाच प्रकल्पासाठी त्यांच्याकडून जमीन अधिग्रहण सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत शिवडे व डुबेरे वगळता सिन्नरमधील इतर गावे आणि इगतपुरीमध्ये जमीन अधिग्रहणाचे काम वेगाने सुरू आहे. आजमितीस प्रशासनाने जिल्ह्यातील 1108 हेक्टर खासगी क्षेत्रापैकी 718 हेक्टरचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. सरकारच्या वनजमिनीच्या 172 हेक्टरपैकी 90 टक्क्यांच्या आसपास अधिग्रहण पूणर्र् झाले आहे.

एकूण क्षेत्राचा विचार केल्यास आजमितीस 70 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खासगी 400 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहण करणे अद्याप बाकी आहे. या क्षेत्रातील शेतकर्‍यांची संख्या सुमारे चार हजार आहे. दरम्यान, शिवडे व डुबेरेतील विरोधामुळे प्रशासनासमोरील डोकेदुखी कायम होती. मात्र, आता शिवडेतीलच एक गट जमीन देण्यास पुढे आल्याने समृद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे. समृद्धी प्रकल्पासाठी 2013 चे भूसंपादन लागू करणार आहे. सरकारने त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून घेतले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या (दि.8) बैठकीत या बदलाला मान्यता देण्यात आली. लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होईल. दरम्यान, जिल्ह्यात आजही 400 हेक्टर क्षेत्राचे संपादन करणे बाकी आहे. जिल्हा प्रशासनाकडून संपादित करायच्या गटाची संख्या, त्याचे क्षेत्र व खातेदारांची संख्या याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर केला जाणार आहे. सरकार एकाचवेळी राज्यातील प्रकल्पासाठी अधिग्रहीत करावयाच्या क्षेत्राची भूसंपादन कायद्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करेल. अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या क्षणापासून भूसंपादनानुसार अधिग्रहण केले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.