Thu, Apr 25, 2019 16:05होमपेज › Nashik › समीर भुजबळही सुटले

समीर भुजबळही सुटले

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:41AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सदनसह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गेली दोन वर्षे अटकेत असलेल्या समीर भुजबळ यांना उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. पाच लाख रुपयांच्या वैयक्‍तिक जाचमुचलक्यावर त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायालयीन कागदाची पूर्तता केल्यानंतर समीर यांची गुरुवारी सुमारे 27 महिन्यानंतर तुरुंगातून सुटका होईल. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनासह सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यात कलम 45 (1) असंविधानिक ठरविल्याचा आधार घेत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी हा सशर्त जामीन मंंजूर केला. छगन भुजबळ यांच्या जामिनाविषयीच्या आदेशाची प्रत उपलब्ध होताच, समीर यांनाही तातडीने जामीन मंजूर करण्याची विनंती करणारा अर्ज अ‍ॅड. एस. के. सक्सेना यांनी उच्च न्यायालयात केला होता.

छगन भुजबळांना  सभेसाठी परवानगी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी पुन्हा मोठा दिलासा दिला. पुणे येथे 10 जून रोजी होणार्‍या जाहीर सभेस उपस्थित राहण्याची त्यांना परवानगी दिली. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना मुंबईच्या बाहेर जाण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्याची अट घातली होती. त्यानुसार भुजबळ यांनी पुण्याला जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. न्यायालयाने विनंती मान्य केली.