Sat, Jul 11, 2020 22:15होमपेज › Nashik › संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराला कोल्हापुरी ‘चिरा’

संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराला कोल्हापुरी ‘चिरा’

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:34PM

बुकमार्क करा

नाशिकः सोमनाथ ताकवाले

वारकर्‍यांसह मराठी जनांचे श्रद्धास्थान असलेले आणि सुमारे सातशे वर्षांचे प्राचीनत्व ल्यालेले संत निवृत्तिनाथ महाराजांचे त्र्यंबकेश्‍वर येथील समाधी मंदिर काळ्या पाषणाच्या दगडी चिर्‍यांत जीर्णोद्धारित होणार आहे. मंदिराचे प्राचीन स्वरूप आणि पुरातत्त्व आगामी एक हजार वर्षेही टिकून राहावे, यासाठी कोल्हापूरचा काळा पाषण बांधकामात वापरण्यात येणार आहे. समाधी मंदिराचे जीर्णोद्धार काम 16 महिन्यांत पूर्ण होणार आहे.

त्र्यंबकेश्‍वरला येत्या 26 डिसेंबरला संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर ट्रस्टने पूर्ण केले आहे. या मंदिराचे प्राचीनत्व कायम राहावे, तसेच आगामी हजार वर्षेही मंदिराच्या आत-बाह्य स्वरूपांवर वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून दगडी बांधकाम करण्याचे निश्‍चित करण्यात आलेले होते.

काळ्या पाषाणाचा उपयोग तीन ठिकाणच्या दगडखाणीतील कातळाच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यात कोल्हापूरसह, नाशिक आणि आंध्र प्रदेशातील दगडखाणींचा समावेश आहे. जेजुरी, पुणे येथे सुरू असलेल्या मंदिरांच्या दगडी बांधकामासाठीही कोल्हापुरातील दगडी खाणीतील चिरा वापरण्यात येत आहेत. त्याचा अभ्यास करून निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्वार बांधकामासाठी करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते.

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे संकल्पचित्र आणि बांधकाम आराखडा वास्तुविशारद अमृता पवार  यांच्याकडून विश्‍वस्त मंडळाने तयार करून घेतलेला आहे. त्यानुसार या कामाला प्रारंभ होणार आहे.  शासन आणि लोकवर्गणीतून सुमारे 25 ते 30 कोटी रुपये खर्चून समाधी मंदिराचा कायापालट होणार आहे. पाच वर्षे काम चालणार असले तरी, मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचे काम 16 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन देवस्थानने केले आहे.

प्राचीनत्वाला महत्त्व

कोल्हापूर येथील दगड कणखर असल्याने त्याचा उपयोग बहुतेक मंदिरांच्या कामांत केलेला आहे. नाशिकला राम मंदिर, नारोशंकर मंदिर, सुंदरनारायण मंदिर, नीलकंठेश्‍वर मंदिर आदी प्राचीन मंदिरांचे दगडीकाम हे आजही कणखर आहे. अशाच प्रकारच्या दगडाचा उपयोग निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारात करण्यात यावा आणि मंदिराचे प्राचीन स्वरूप कायम राहावे, यासाठी काळ्या पाषाणाला बांधकामात स्थान देण्यात आलेले आहे. मंदिराच्या दगडी चिर्‍यांना आकार देण्यासाठी राज्यासह परराज्यातून कारागीर आणण्यात येणार आहेत. तसेच, कोरीव काम करण्यासाठी यंत्रसामग्रीचा आधार घेण्यात येणार आहे.