नाशिक : प्रतिनिधी
गांजा साठा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुख्य संशयित लक्ष्मी ताठे हिच्याकडील संपत्तीच्या स्त्रोतांबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शोध सुरू केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गांजा विक्रेते आणि खरेदीदार यांच्यासोबत ताठे हिचे असलेले देवाण-घेवाणीचे संबंध उघड केले आहेत. त्यामुळे ताठे हिच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिकाधिक घट्ट करण्यावर पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
पंचवटीतील तपोवन परिसरातून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गेल्या महिन्यात एका ट्रकमधून 680 किलो गांजाचा साठा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून ठिकठिकाणाहून सहा संशयित आणि सुमारे एक टन गांजाचा साठा जप्त केला. हा गांजा पंचवटीतील शिवसेनेची माजी पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिने मागवल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. मात्र, ताठे फरार झाली होती. पोलिसांनी तपास करून दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून तिला अटक केली.
न्यायालयाने 13 जुलैपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताठे हिच्या अन्य साथीदारांचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, उत्पन्नाचे साधन नसतानाही ताठे हिने संपत्ती मिळवली कशी, याचाही पोलीस तपास करीत आहेत. ताठे हिच्या मालमत्तांचा शोध घेत गांजा विक्रीतून त्यांनी ही मालमत्ता जमवली का, याचाही तपास गुन्हे शाखा करीत आहे. ताठे हिचे दोन साथीदार फरार असल्याने पोलीस त्यांचाही शोध घेत आहे.