Fri, Apr 26, 2019 20:03होमपेज › Nashik › मालेगावला व्यापार्‍याचा पत्नीकडून खून 

मालेगावला व्यापार्‍याचा पत्नीकडून खून 

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 11:07PMमालेगाव : प्रतिनिधी

अक्सा कॉलनीत राहणार्‍या परप्रांतीय डाळिंब व्यापार्‍याचा निर्घृण खून करून त्याची पत्नी पैशांसह फरार झाल्याची घटना  गुरुवारी (दि.15) सकाळी उघडकीस आली आहे. महिनाभरापूर्वीच मयताचा दुसरा निकाह झाला होता. पोलीस फरार पत्नीचा शोध घेत आहेत.

अक्सा कॉलनीतील मोहंमदिया टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये मो. सज्जाद मोहम्मद बशीर (35) हा डाळिंब  व्यापारी राहत होता. कसमादे तालुक्यातून डाळिंब खरेदी करून कोलकात्याला माल पाठवण्याचा तो व्यापार करीत होता. 10 जानेवारी 2018 रोजी त्याचा नाजिया नामक 25 वर्षीय तरुणीशी दुसरा निकाह झाला होता. गुरुवारी सकाळी त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी गेला असता सज्जाद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.  घरात त्याची पत्नी त्यावेळी दिसत नव्हती.

त्याने रमजानपुरा पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने व सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सज्जादच्या डोळ्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून आले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ मो. शमशाद मो. बशीर याने फिर्याद दिली आहे. व्यापारामुळे घरात मोठ्या प्रमाणात रोकड असायची. त्यातच लग्नापासून नाजियाचे वागणे संशयास्पद होते. तिनेच भावाचा खून करून घरातील रोकड घेऊन पलायन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.