Tue, Jul 16, 2019 02:14होमपेज › Nashik › सहाणेंनी घेतली भुजबळांची भेट

सहाणेंनी घेतली भुजबळांची भेट

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य नाशिक मतदारसंघ निवडणुकीचे रणांगण तापण्यास सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात जाऊन माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीने सहा वर्षांपूर्वी एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या या दोन नेत्यांमध्ये खरोखरच मनोमीलन होणार का, हे प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

निवडणूक जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असताना शिवसेनेने सहाणे यांची हकालपट्टी करून नरेंद्र दराडे यांना उमेदवारीदिली. सहाणे यांनीही राष्ट्रवादीत दाखल होत उमेदवारी मिळविली. दराडे आणि सहाणे यांच्यातच लढत होणार, असे चित्र सुरुवातीला निर्माण झालेले असताना अपक्ष परवेझ कोकणी यांच्या उमेदवारीने लढत तिरंगी होणार आहे. विजयासाठी आवश्यक मतांचा जादुई आकडा गाठण्यासाठी या तिघांमध्येही चढाओढ सुरू आहे. माघारीचा टप्पा पार पडल्यानंतर मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. याच धामधुमीत भुजबळ यांची जामिनावर झालेली सुटका महत्त्वपूर्ण मानली जात असून, विधान परिषदेचे गणित बदल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार घेणार्‍या भुजबळ यांची सहाणे यांनी बुधवारी भेट घेऊन आशीर्वाद मागितला. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार जयवंत जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी शहराध्यक्ष अर्जुन टिळे हेही उपस्थित होते. निवडणुकीच्या डावपेचात भुजबळ यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार असल्याने सहाणे यांची बाजू जमेची मानली जात आहे. पण, ज्यावेळी सहाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यावेळी भुजबळ यांना विचारात घेण्यात आले नसल्याने भुजबळ समर्थकांमध्ये त्यावेळी नाराजी होती. सहाणे-भुजबळ भेटीने ही नाराजी दूर होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.