Thu, May 23, 2019 04:43होमपेज › Nashik › कार्यकर्त्यांनी मांडल्या  राज ठाकरेंपुढे व्यथा 

कार्यकर्त्यांनी मांडल्या  राज ठाकरेंपुढे व्यथा 

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 03 2018 1:41AMनाशिक : प्रतिनिधी

मनसेच्या सत्ताकाळात झालेल्या कामांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत भाजपाकडून काहीच कामे झालेली नाहीत. उलट अंबड-सातपूरमधील कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची व्यथा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडली. त्यावर आता कोठे गेला दत्तक बाप असा प्रतिप्रश्‍न करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

राज्याच्या दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांंचे रविवारी (दि.2) धुळे येथील जाहीर सभा आटोपून रात्री उशिरा येथील विश्रामगृहावर आगमन झाले. प्रदीर्घ काळानंतर ठाकरे नाशिकमध्ये आल्याने मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले व त्यांना बोलण्याची विनंती केली. परंतु, ‘नेहमी मीच बोलू का, आज तुम्ही बोला’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना बोलते केले. शहरात मनसेच्या काळात तयार झालेले प्रकल्प बंद पडण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी मनसेने तयार केलेल्या अ‍ॅपवर येणार्‍या तक्रारींची दखल घेतली जात    नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली. एकलहरे येथील वीज प्रकल्प विदर्भात हलविण्याचा घाट घातला जात आहे. तसे झाल्यास हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

भाजपाचे स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘मनसे स्टाइल’आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे एका कार्यकर्त्याने ठाकरे यांना सांगितले. वीज व अन्य कर परवडत नसल्याने अंबड व सातूपर एमआयडीसीतील उद्योग बाहेर जात आहेत. हे थांबविणे गरजेचे असल्याची भावनादेखील कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून भाजपा शहरावर करवाढ लादत आहे. करवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे ठोस भूमिका घेत विरोध करण्याची वेळ आल्याचेही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांनी सांगितले.

त्यावर ‘दत्तक बाप’ कोठे गेला आहे, नाशिककरांनी केलेला विरोध कमी आहे का?फ असा सवाल उपस्थित करीत ठाकरे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. दरम्यान, राज ठाकरे हे सोमवारी (दि. 3) पुण्याला जाणार आहेत. तेथे राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्या मतदारसंघातील विविध कामांना ते भेटी देणार आहेत.