Sun, Jul 21, 2019 05:48होमपेज › Nashik › जिल्ह्यात एसटी वाहतूक ठप्प

जिल्ह्यात एसटी वाहतूक ठप्प

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 11:47PMनाशिक : प्रतिनिधी 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली एकतर्फी वेतनवाढ नाकारत राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि.8) कोणतीही पूर्वसूचना न देता संपाचे हत्यार उपसले. परिणामी, एसटी बससेवा 80 टक्के ठप्प होती. नाशिकमधील ठक्‍कर्स बझार, महामार्ग, जुने सीबीएस बसस्थानकात बसेस जागेवरच उभ्या होत्या. संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटी बस बंदमुळे खासगी वाहतूकदारांनी उत्पन्नाची पर्वणी साधली. संपामुळे नाशिक विभागाला साधारणत: एक कोटीचा तोटा सहन करावा लागला. दरम्यान, कारवाईच्या भीतीपोटी संप हा कर्मचार्‍यांनी पुकारला होता, असे सांगत कामगार संघटनांनी ‘कातडी बचाव’ची भूमिका घेतली.

एसटी कर्मचार्‍यांचा वेतन कराराचा मुद्दा चिघळला आहे. परिवहनमंत्री रावते यांनी एसटी कर्मचार्‍यांना चार हजार 849 कोटींची वेतनवाढ दिली होती. मात्र, एसटी कामगार संघटना (मान्यताप्राप्त) व इंटक या प्रमुख संघटनांनी ही वेतनवाढ फेटाळून लावली. सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर समकक्ष करार द्यावा, ही कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी होती. मात्र, जाहीर केलेला वेतन करार समाधानकारक नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यामुळे कर्मचार्‍यांनी  शुक्रवारपासून अचानकपणे संपावर गेले. नाशिक जिल्ह्यातही संपाचा परिणाम पाहायला मिळाला. शहरातील ठक्कर्स बझार, महामार्ग, जुने सीबीएस बसस्थानकांवर एक-दोन फेर्‍यांचा अपवाद सोडला तर बसेस धावल्या नाहीत.

90 टक्के बसेस बसस्थानकात जागेवरच उभ्या होत्या. संपाला हिंसक वळण लागू नये व बसेसला सुरक्षा देण्यासाठी बसस्थानकांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे प्रवाशांना या संपाची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे एसटीने प्रवास करण्यासाठी बसस्थानकांमध्ये आलेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला. बसची वाट बघत तासन्तास प्रवासी ताटकळले होते. संप मिटेल आणि एसटी सुरू होईल अशी प्रवाशांना आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली. रात्री उशिरापर्यंत कर्मचारी संपावर होतेे. संप मिटत नसल्याने जादा पैसे मोजून प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदार व ट्रॅव्हल्स कंपन्यांचा बक्कळ धंदा झाला. संपाचा फायदा घेत काही खासगी वाहतूक दारांनी तिकिटाचे दरदेखील वाढवले होते. एकूणच संपामुळे एसटीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

निलंबनाची कारवाई रद्द

वरिष्ठ लिपिक व्ही. के. पवार, टंकलेखक एस. एन. मंडोठिया, लिपिक शरद कोल्हे व संगीता फुके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसे पत्रकदेखील जारी करण्यात आले होते. मात्र, सायंकाळी ते पत्रक मागे घेऊन त्यांच्या निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली.

सिडकोत नोकरदारांची गैरसोय; रिक्षाचालकांना बोनस

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी मध्यरात्री पासून अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा परिणाम शहर बसवाहतुकीवर झाल्याने सिडको भागात विद्यार्थी-नोकरदारांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.पगारवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी अनपेक्षितपणे कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नोकरदार व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शहर वाहतुकीच्या बसची वाट पाहण्यात प्रवाशांचा वेळ वाया गेला.

रिक्षाचालकांना बोनस ः शहर बसवाहतुकीच्या फेर्‍या होत नसल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव रिक्षा प्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागला. परिणामी एसटी कर्मचार्‍यांचा संप मात्र, रिक्षाचालकांसाठी बोनसच ठरल्याची चर्चा सुरू होती. सकाळपासूनच बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांनी रिक्षांचा पर्याय स्वीकारला. 

गर्दीची ठिकाणे झाली सुनी ः परिसरातील पवननगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजी चौक, गणेश चौक, महाराणा प्रताप चौक, उत्तमनगर, कलानगर, चेतनानगर, पाथर्डी फाटा ही सतत गर्दीची ठिकाणे बसवाहतूक नसल्याने सुनसान झालेली पाहावयास मिळाली.