Sat, Aug 24, 2019 21:24होमपेज › Nashik › ‘मातोश्री’ बाहेर एसटी कर्मचारी करणार आक्रोश

‘मातोश्री’ बाहेर एसटी कर्मचारी करणार आक्रोश

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 20 2018 12:00AMनाशिक : प्रतिनिधी

वेतन करार निश्‍चित करण्यासाठी गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीने निराशा केल्याने एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मुंबईत शुक्रवारी (दि.19) कृती समितीच्या झालेल्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला. 

29 जानेवारीपूर्वी संपाची नोटीस एसटी प्रशासनाला दिली जाणार आहे. तसेच, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा निषेध करण्यासाठी एसटी कर्मचारी  9  फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी मोर्चा काढून आक्रोश करणार आहेत.

नवीन वर्षात एसटी कर्मचार्‍यांचा वेतन कराराचा प्रश्‍न मार्गी लागेल ही अपेक्षा पुन्हा एकदा फोल ठरली असून, कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. एसटी कामगारांचा जुना वेतन करार मार्च 2015 मध्ये संपुष्टात आला. परिवहनमंत्री याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याचा, आरोप मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना व इंटकने केला आहे. वेतन कराराबाबत तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेला अहवाल या संघटनांनी फेटाळून लावला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबईत कृती समितीची बैठक बेनकारा सभागृहात पार पडली.

त्यात पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेण्यात आला. 9 फेब्रुवारीला एसटी प्रशासनाला याबाबत पूर्वकल्पना देऊन संपाची नोटीस दिली जाणार आहे. तसेच, उच्चाधिकार समितीने दिलेला अहवाल हा अपमानास्पद असल्याने गुरुवारी (दि.25) प्रत्येक जिल्ह्यातील आगार, युनिट व विभागीय कार्यालयासमोर या अहवालाची सामूहिक होळी केली जाणार आहे.

तसेच, परिवहनमंत्री दिवाकर रावते हे एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीबाबत गंभीर नसल्याने त्यांचादेखील निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना व इंटकने वेतन करार नको तर सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी केली होती. या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी ऐन दिवाळीत सलग चार दिवस संप केला होता.