Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Nashik › .. तर १७ मे रोजी एसटीचा संप अटळ

.. तर १७ मे रोजी एसटीचा संप अटळ

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 12 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी 

परिवहनमंत्री दिवाकर रावते हे भ्रष्टाचारी असून, शिवशाही बससेवेच्या माध्यमातून त्यांनी एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. रावतेंमुळे परिवहन खात्याची वाट लागली आहे. येत्या 1 मे ला वेतनकरार करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जर सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर समकक्ष करार नसल्यास येत्या 17 मे रोजी कोणत्याही परिस्थितीत एसटीचा संप होणारच, असा इशारा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला.

वेतनवाढीसाठी इंटकतर्फे गुुरुवारी (दि.12) चोपडा लॉन्समध्ये एल्गार मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित हजारो एसटी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी, के. के.नायर, एच. बी. रावराजे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, धर्माजी भोसले, श्रीकांत सटू, डी. पी. बनसोड, शिल्पा काकडे आदी उपस्थित होते. परिवहन खात्याच्या गलथान कारभारावर छाजेड यांनी टीकेची झोड उठवली. शिवशाही बससेवेच्या नावाखाली खासगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. छत्रपतींचे नाव घेऊन जो काही कारभार सुरू आहे ते बघता जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी रावतेंचा कडेलोट केला असता, असे ते म्हणाले.

एसटी बसस्थानके स्वच्छतेचा ठेका भाजपाच्या एका आमदाराला देण्यात आला आहे. त्यासाठी 450 कोटी रुपये मोजले जाणार आहे. हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिवाळीत संप करून एसटी कर्मचार्‍यांनी त्यांची ताकद दाखवून दिली होती. एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग दिला पाहिजे. एसटी कर्मचारी भीक नाही तर त्यांचे हक्क मागत आहेत. 1 मे ला जर सन्मानजनक वेतन करार दिला नाही तर कर्मचार्‍यांचा प्रचंड उद्रेक होईल. त्यानंतर एकही शिवशाही बस रस्त्यावर धावू देऊ नका. आंध्र पदेश व तेलंगणामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी सलग 45 दिवस संप करून हवा तसा करार पदरात पाडून घेतला. संप हे अखेरचे शस्त्र आहे. जर सातव्या वेतन आयोगाइतका समकक्ष करार झाला नाही तर येत्या 17 मे ला संप हा होणारच. न्यायालयाने जरी हा संप बेकायदा ठरवला तरी संप सुरूच राहील, असा इशारा देत छाजेड यांनी संपाचे रणशिंग फुंकले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रेड्डी यांनी एसटी कर्मचार्‍यांनी संप केल्यास त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहू, असे आश्‍वासन दिले.

जेवणासाठी वणवण

मेळाव्यासाठी कर्मचारी स्वखर्चाने नाशिकला आले होते. मात्र, त्यांच्यासाठी जेवण अथवा नाश्त्याची कोणतीही व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली नव्हती. फक्त हॉलबाहेर पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचार्‍यांना जेवणासाठी भर उन्हात वणवण करावी लागली.

खासगी बसेसने आले कर्मचारी 

मेळाव्यासाठी राज्यभरातून एसटी कामगार आले होते. मात्र, एसटीने येण्याऐवजी त्यांनी वातानुकूलित खासगी बसेसने येणे पसंत केले. जर ते एसटीने आले असते तर महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली असती. मात्र, एसटीपेक्षा खासगी प्रवास स्वस्त असल्याने खासगी बसने आल्याचेे उपस्थितांनी सांगितले.

कामगार संघटनेवर घणाघात

मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना व इंटक या दोघांनी दिवाळीत एसटीचा संप यशस्वी करून दाखवला होता. मात्र, आता कामगार संघटनेच्या नेत्यांना कधी वेतन करारावर स्वाक्षरी करण्याची घाई झाली आहे. परिवहनमंत्र्यांनी करारात 1200 कोटी दिले तर प्रत्येक कर्मचार्‍याच्या वाट्याला अवघे 1200 रुपये वेतनवाढ होईल. जर या करारावर कामगार संघटनेने स्वाक्षरी केली तर त्यांची बोटे शिल्लक राहणार नाही, असा दमच छाजेड यांनी भरला. इंटकने कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनेशी हातमिळवणी केली होती. मात्र, जर त्यांनी दगाफटका केला तर इंटक स्वबळावर संप यशस्वी करून दाखवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच, दिवाळीत संप मिटल्यावर कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे हे रावते यांच्या दालनात शिरा खात होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.