Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Nashik › एसटी वेतन करार मान्यताप्राप्त संघटनेने नाकारला

एसटी वेतन करार मान्यताप्राप्त संघटनेने नाकारला

Published On: Jun 04 2018 1:06AM | Last Updated: Jun 03 2018 10:30PMनाशिक : प्रतिनिधी

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेला एसटीचा वेतन करार महाराष्ट्र एसटी कामगार संघटना (मान्यताप्राप्त) यांनी नाकारला आहे. रविवारी (दि.3) संघटनेची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही वेतनवाढ कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असून, ती फेटाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सोमवारी (दि.4) कराराची प्रत संघटनेला प्राप्त होणार असून, त्यानंतर पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे.

मागील दीड वर्षांपासून रखडलेला एसटी कर्मचार्‍यांचा वेतन कराराची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या वर्धापनदिनी 1 जूनला घोषणा केली होती. तब्बल 4 हजार 849 कोटीची वेतनवाढ जाहीर केली. मात्र, एकतर्फी जाहीर करण्यात आलेल्या या वेतनवाढ करार मान्यताप्राप्त संघटनेने नाकारला आहे. हा आकडा फुगवून दाखविण्यात आल्याचा आरोप संघटनेेने केला आहे. कामगारांना वेतनवाढ स्वीकारा, अन्यथा राजीनामे द्या अशी धमकी देत दबावाचे राजकारण केले जात आहे. मान्यताप्राप्त संघटना कोणत्याही परिस्थितीत ही हुकूमशाही सहन केली जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोणत्या निकषांच्या आधारे ही वेतनवाढ केली गेली, नेमके सूत्र कोणते होते, त्याचा चार्ट महामंडळाने प्रसिध्द केला नसल्याने या मागचे गौडबंगाल काय, असा प्रश्‍न संघटनेने उपस्थित केला आहे. महामंडळाने जाहिरातीमध्ये 32 ते 48 टक्के वेतनवाढ झाल्याचे ढोल बडवत आहे.

मात्र, प्रत्यक्षात 17 ते 20 टक्केच वेतनवाढ झाल्याचा दावा, संघटनेने केला आहे. संघटनेचा वेतनवाढीचा चार्ट हा आज प्राप्त होणार आहे. त्याचा सखोल अभ्यास करुन पुढील रणनिती ठरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच, वेतनवाढीत फसवेगिरी आढळल्यास कर्मचार्‍यांनी वेतनवाढ नाकारत असल्याचे फॉर्म भरावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.