होमपेज › Nashik › निफाडच्या नभांगणात मैनांचे गुंजन!

निफाडच्या नभांगणात मैनांचे गुंजन!

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:57PMउगाव : वार्ताहर

गुलाबी थंडीचा मुक्‍काम संपत असताना निफाड शहर आणि परिसरात देश-विदेशातील स्थलांंतरित हजारो पक्षी निफाडच्या नभांगणात भटकंती करताना दिसत आहेत. विनता-कादवेच्या पाणथळ जागांवर त्याचबरोबर शहरातील मोठमोठ्या वृक्षराजीवर या पक्ष्यांनी आपले बस्तान बसवले आहे.

गुलाबी मैना (रोझी पाश्‍चर) यांच्या झुंडी शहरात दाखल झालेल्या आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या चित्ताकर्षक कवायती अन् किलबिलाट निफाड शहारत पाहावयास मिळतो. निफाडलगतच जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्याचा परिसर आहे. निफाड शहरातील कादवा आणि विनता नदीच्या पाणथळ क्षेत्रावर हजारो पक्षी स्वच्छंदाने विहार करतात. निफाड शहरातील बसस्थानक, तहसील कार्यालय, जुना सरकारी दवाखाना, निफाड उपबाजार आवार, उगाव रोड आदींसह शहरातील वृक्षांवर या पक्ष्यांनी निवारा थाटला आहे. साधारणपणे जानेवारी ते एप्रिल महिन्यात गुलाबी मैना लाखोंच्या संख्येने शहर परिसरात आपले बस्तान बसवतात. गुलाबी मैनांचे थवे निफाड शहरात डेरेदाखल झाले आहेत. या गुलाबी मैना सकाळी शिवारात अन्‍न-पाणी शोधण्यास जाण्यापूर्वी आणि सायंकाळी परतताना सुमधुर गुंजन करतात.

निफाड शहरात थवे आकाशावर हुकुमत गाजवत स्लाइड शोप्रमाणे कवायती करीत असल्यासारखे नेत्रसुखद द‍ृश्य येथील नागरिकांंच्या डोळ्यांचे पारणे फेडताना दिसत आहेत. या गुलाबी मैनांबरोबरच देश-विदेशातील  स्थलांतरित पक्षी गप्पीदास, राखी वटवट्या, रान वटवट्या, चिरक, सुगरण, भांगवाली मैना, जांभळा सूर्यपक्षी,  हळद्या, कोतवाल, शंकर, निळकंठ, बलबुल, तांबट, हुदहुद, वेडा राघू, धोबी, सामान्य पाकोळी, घर पाकोळी, भारद्वाज, घुबड, होला, लालपंखी होला, बगळा, गायबगळा, ढोकरी, हिरवी ढोकरी, रात्रींचर ढोकरी, राखी बगळा, बदामी पंचक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, छोटा शराटी, हळदी कुंकू, कापसी घार, दलदल, हरीण, जांबळी पाणकोंबडी, चांदीबदक, शिकरा, चमचा, तुतारी, शेकाट्या, नदीसुरय, कबुतर, पारवा आदी विविध प्रजातींचे पक्षी डेरेदाखल झाले आहेत.