Sat, Aug 24, 2019 00:02होमपेज › Nashik › मेंढ्यांनी फोडले निकृष्ट कामाचे बिंग; मेंढपाळास बेदम मारहाण

मेंढ्यांनी फोडले निकृष्ट कामाचे बिंग; मेंढपाळास बेदम मारहाण

Published On: Jan 15 2018 9:40AM | Last Updated: Jan 15 2018 11:56AM

बुकमार्क करा
डुबेरे : वार्ताहर

सिन्‍नर तालुक्यातील डुबेरे शिवारात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून मेंढ्या गेल्याने सदरच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे धक्कादायक प्रकार उडकीस आला. मेंढ्याने निकृष्ट कामाचे बिंग फोडल्याने संतप्त झालेल्या संबंधित ठेकेदाराने मेंढपाळास बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाटोळे ते डुबेरे रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पंचायत समितीच्या निधीतून एक किलोमीटरचे काम नाशिक येथील एका ठेकेदाराला देण्यात आले होते. अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्यावर दगड, खडी-मुरुम आणि कच-डांबरीकरण असे तीन थर बंधनकारक होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने निकृष्ट काम करत सरसकट डांबराचा थर दिला.

रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी रोडरोलरच्या सहाय्याने न दाबातच डांबराचा फवारा मारण्यात आला आहे. याच रस्त्यावरून मेंढ्या गेल्याने खडी उखडून पडली. त्यामुळे रस्त्याच्या कामात अंदाजपत्रकाप्रमाणे साहित्य न वापरता केवळ मलमपट्टी केल्याचे वास्तव समोर आले. मेंढ्यामुळे रस्ता उखडल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदाराने मेंढपाळास मारहाण केली. सोबतच रस्त्याचे नुकसान भरपाई म्हणून मेंढीपालाकडून दहा हजार रुपये संबंधित ठेकेदाराने घेतले.

हा प्रकार रविवारी (दि.14) सकाळी सरपंच अश्‍विनी वारूंगसे आणि उपसरपंच अनिल वारूंगसे यांना समजला. सरपंच-उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य कमलाकर वाजे, सुनील वारुंगसे, कैलास ढोली, विशाल ढोली, वसंत सांगळे, रामेश्‍वर माळी, अर्जुन कराड, राजेंद्र मंडलिक, संदिप रेवगडे, सौरभ आगळे, प्रमोद बोचरे, योगेश वाजे आदी ग्रामस्थांनी कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान ठेकेदाराने रस्त्याचे निकृष्ट काम केल्याचे सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ठेकेदाराकडून परिसरातील ग्रामस्थांना दमदाटी केली जात आहे. त्यामुळे रस्त्याचे काम थांबविण्यासोबतच ठेकेदाराची चौकशी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.