Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Nashik › क्रांतिकारी संत

क्रांतिकारी संत

Published On: Sep 02 2018 1:15AM | Last Updated: Sep 02 2018 12:27AMतरुणसागर महाराज यांचे मूळ नाव पवन कुमार जैन. त्यांचा जन्म दमोहच्या (मध्य प्रदेश) गुहजी या गावात 26 जून 1967 रोजी झाला. मुनिश्री यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग करून छत्तीसगड येथे दीक्षा घेतली. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी आचार्य पुष्पदंत सागर यांच्याकडून वडोदरा येथून दीक्षा घेतली. एका दूरचित्रवाहिनीवरून त्यांची महावीर वाणी प्रवचन प्रसारित होऊ लागल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

प्रवचन आणि व्याख्यानांसाठी ते देशभर प्रवास करीत होते. सततच्या प्रवासामुळे 2007 साली त्यांची प्रकृती खालावली. कोल्हापूर येथील वास्तव्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. कोल्हापूरमध्येच त्यांनी जैन मुनी म्हणून कायम कार्यरत राहण्याचा निर्धार केला होता.

दिल्लीतील लाल किल्ल्यावरून त्यांनी 2000 साली प्रवचन दिले होते. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांमध्येही त्यांचे प्रवचनाचे अनेक कार्यक्रम झाले. 2006 साली कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील महामस्तक अभिषेक सोहळ्यास बंगळूरहून 65 कि.मी. पायी चालत ते हजर राहिले होते.

तरुणसागर महाराज यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही त्यांनी प्रवचन दिले होते. कडव्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील दांभिकतेवर बोट ठेवले. भ्रष्टाचार, हिंसाचाराविरोधात त्यांनी कठोर मते व्यक्‍त केली होती. शुचिर्भूत जीवनासाठी मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला अनुयायांना ते देत असत. मांस आणि चामड्याची निर्यात थांबविण्यासाठी त्यांनी अंहिसा महाकुंभच्या माध्यमातून चळवळ सुरू केली होती. दारूबंदीसाठीही त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून आग्रही भूमिका मांडली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात 2009 साली त्यांनी चामडी पट्टा न घालण्याचा सल्ला दिला होता.दिगंबर जैन समुदायाशिवाय सर्व धर्मात त्यांचे अनुयायी आहेत. कडवे प्रवचन या नावाने त्यांनी पुस्तकही प्रकाशित केले आहे.