Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Nashik › ग्रामपालिका हद्दीत ‘झिंग झिंग झिंगाट’!

ग्रामपालिका हद्दीत ‘झिंग झिंग झिंगाट’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : रावसाहेब उगले

ग्रामीण भागांतील तळीरामांसाठी सुखद बातमी असून, आता ग्रामपालिका हद्दीतील महामार्गांवर ‘झिंग झिंग झिंगाट’ पुन्हा अनुभवाला येणार आहे. किमान 5 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपालिका हद्दीतील राष्ट्रीय व राज्यमार्गांवरील 500 मीटर अंतरावर असलेली देशी-विदेशी मद्याची बंद असलेली दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत. 

राज्याच्या गृह विभागाने 31 मार्च 2018 रोजी यासंदर्भात आदेश काढला आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागांतील मोठ्या ग्रामपालिका हद्दीतील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय व राज्यमार्गांवरील 500 मीटर हद्दीतील देशी-विदेशी मद्याची दुकाने, बिअर बार बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे विक्रेते व कामगारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. अनेक व्यावसायिकांनी दुकाने सुरू करू देण्याची मागणी केली होती. तिचा विचार करून महापालिका, नगरपालिका हद्दीतील बिअर बार व देशी-विदेशी मद्याची दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती.

परंतु, ग्रामपालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. या व्यावसायिकांनीही वेळोवेळी आपली भूमिका शासनाकडे मांडली होती.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, किमान 5 हजार लोकसंख्या असलेल्या वा औद्योगिक क्षेत्र असलेल्या ग्रामपालिका हद्दीतील राष्ट्रीय व राज्यमार्गांवरील बिअर बार, दारू दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उत्पादन शुल्कच्या आयुक्‍त डॉ. अश्‍विनी जोशी यांनी सर्व उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना परवान्याचे नूतनीकरणाचे आदेश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्रेत्यांची बाजू अ‍ॅड. प्रशांत केंजळे यांनी मांडली.

जिल्ह्यातील या ग्रामपालिकांचा समावेश

निफाड : पिंपळगाव बसवंत, ओझर, लासलगाव, विंचूर, चांदोरी, सायखेडा. इगतपुरी : घोटी, वाडीवर्‍हे, नांदगाव सदो. दिंडोरी : वणी, खेडगाव, लखमापूर फाटा. कळवण : अभोणा. सिन्‍नर : नांदूरशिंगोटे, वावी. चांदवड : वडाळीभोई, वडनेरभैरव. मालेगाव : दाभाडी, झोडगे, सौंदाणे. येवला : पाटोदा, अंदरसूल, नगरसूल. त्र्यंबकेश्‍वर : वाढोली, तळवाडे फाटा. देवळा : लोहोणेर, उमराणे. सटाणा : ताहाराबाद, नामपूर, लखमापूर. नांदगाव : न्यायडोंगरी.

अवैध दारू विक्रीला चाप

या निर्णयामुळे जिल्ह्यात बेसुमार होणार्‍या अवैध दारू विक्रीला चाप बसणार आहे. त्यामुळे बनावट दारू विक्रीलाही लगाम लागणार आहे.

येथील मद्यालये सुरू होणार

गावची किमान लोकसंख्या पाच हजार असावी.
ग्रामपंचायत क्षेत्रात एमआयडीसी क्षेत्र
केंद्र किंवा राज्य सरकारने घोषित पर्यटनस्थळ (तीर्थक्षेत्र वगळून)
ज्या ग्रामपंचायतीचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे.

 

Tags : nashik, nashik news, liquor shops, highway, rural area,


  •