Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Nashik › नाशिकमध्ये ३५ ठिकाणी टेरेसवर रेस्टॉरंट, बार 

नाशिकमध्ये ३५ ठिकाणी टेरेसवर रेस्टॉरंट, बार 

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:31PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

शहरासह परिसरात इमारतींच्या टेरेसवर उभारण्यात आलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंटसह इतर व्यवसाय थाटणार्‍यांना मनपाच्या नगररचना विभागाने 35जणांना नोटीस बजावत व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मनपाची ही नोटीस म्हणजे संबंधितांना केवळ पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित ठिकाणी सर्रासपणे व्यवसाय सुरू असूनही नगररचना विभागाने डोळेझाक करण्यामागील ‘अर्थ’ काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

मुंबईतील कमला मिल कंपाउंडिंगमधील एका इमारतीवरील रेस्टॉरंट व पबला लागलेल्या आगप्रकरणी मोठ्या शहरांमधील टेरेसवर असणार्‍या हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्‍न समोर आला आहे. केवळ मुंबई, पुणेच नव्हे तर नाशिकसारख्या शहरातही अशा प्रकारची संस्कृती हळूहळू पाय पसरू लागली असून, त्याकडे मनपा आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पबच्या जागी आज शहरात अनेक ठिकाणी बिनदिक्कतपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्याचबरोबर अनेक इमारतींच्या टेरेसवर रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स सुरू आहेत. त्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाची ना परवानगी आहे ना पोलीस दप्तरी त्याची नोंद.

सामान्य नागरिकांना या व्यवसायाची माहिती होऊ शकते तर तिथे विभागातील शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता तसेच उपअभियंत्यांकडून या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करण्यामागील कारण काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. याच प्रकरणी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

असे असताना नगररचना विभागातील गेंड्याची कातडी पांघरलेले अभियंते मात्र काही हालचाल करायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर नगररचना विभागाने सर्वेक्षण केले. त्यात 35 ठिकाणी टेरेसवर हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू असल्याचे आढळले असून, त्यांना केवल नोटीस बजावून नगररचनाने आपले इतिकर्तव्य पूर्ण केले आहे. यामुळे या कारवाईतही अर्थ दडलेला दिसून येतो. कारण नोटीसद्वरे टेरेसचा वापर बंद करण्यात यावा, एवढेच म्हटले आहे.