Thu, Sep 20, 2018 23:51



होमपेज › Nashik › मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण : प्रकाश आंबेडकर 

मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण : प्रकाश आंबेडकर 

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:29PM



नाशिक : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबात भाजपा सरकार गंभीर नसून ते आंदोलकांना नेहमीप्रमाणे भूलथापाच देत आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून काही साध्य होणार नाही. भाजपाने बोलण्याऐवजी कृती करून दाखवावी. घटनेतील तरतुदीनुसार आर्थिक नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे स्पष्ट मत भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. तसेच, वंचित बहुजन आघाडीची मोट बांधून पुढील लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आयोजित संवाद यात्रेनिमित्त रविवारी (दि.29) नाशिकमध्ये आला असता अ‍ॅड. आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपा व संघावर टीका करत, मराठा आरक्षण या मुद्यांवर भाष्य केले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, भाजपा नेते त्यांची भूमिका मांडण्याऐवजी विरोधी पक्षाप्रमाणे लोकप्रियतेसाठी विधाने करीत आहेत.राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे धनगर समाजाने आता संघर्षाऐवजी सत्ता मिळविण्याचा मार्ग निवडला आहे.

त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायलयात स्पष्ट भूमिका मांडावी. जेणेकरून मराठा समाज त्यांचा निर्णय घेईल, अशी मागणी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. 2019 मध्ये दिल्लीत पुन्हा भाजपा सरकार आल्यावर घटना दुरुस्ती केली जाईल, असे संघाकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी दुरुस्तीचा मसुदा जाहीर केला तर अधिक चांगले होईल, असा टोला त्यांनी लगावला. शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मत मांडले आहे. तसेच, केंद्रातील सरकार देखील आर्थिक निकषाची री ओढत आहे. मात्र, घटनेतील तरतुदीनुसार आरक्षण हे सामाजिक मागासलेपणावर दिले जाईल, अशी तरतूद आहे. दलित असो की आदिवासी यांना सामाजिक मागासलेपणावरच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक निकषाचा मुद्दा खोडून काढत मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केलेे.

लोकसभेसाठी काँग्रेसकडे दहा जागांची मागणी : महाराष्ट्रभर दौरे करून दलित, ओबीसी, धनगर यांसह बाराबलुतेदार व मुस्लिमांची मोट बांधून वंचित बहुजन आघाडीची वज्रमूठ उभारली जाईल. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर आम्ही काँग्रेसकडे लोकसभेसाठी दहा जागांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये धनगर, भटके विमुक्‍त, ओबीसी, ओबीसींमधील अतिमागास व मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींना प्रत्येकी दोन अशा एकूण दहा जागांची मागणी केली आहे. काँग्रेसकडून चर्चेसाठी अजून बोलावणे आले नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले... : * राज ठाकरे यांचे विधाने गांभीर्याने घेत नाही * मराठा आमदारांचे राजीनामे म्हणजे नौटंकी * दोन्ही काँग्रेस घराणेशाही जोपासताहेत *  राज्याची सत्ता 169 परिवारांच्या हाती * राज्य सरकार गुप्त यंत्रणा उद्ध्वस्त करायला निघाले * सरकारला मंडळे बंद करायची आहेत