होमपेज › Nashik › धक्‍कादायक; प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तिपर कार्यक्रमात अश्‍लील नृत्ये

धक्‍कादायक; प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तिपर कार्यक्रमात अश्‍लील नृत्ये

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 1:33AMसिडको : वार्ताहर

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित देशभक्तिपर कार्यक्रमात युवतींनी भोजपुरी गीतांवर अश्‍लील नृत्ये केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 26) घडला. या नृत्यांगनांवर उपस्थितांपैकी काहींनी नोटाही उधळल्या. शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यातर्फे आयोजित या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार अपूर्व हिरेदेखील उपस्थित असल्याने या प्रकाराविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. 

अंबडच्या कामटवाडा परिसरात शिवसेनेचे माजी पदाधिकारी बी. एल श्रीवास्तव यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्‍तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र त्यात भोजपुरी गीतांवर तरुणींचे अश्‍लील नृत्य सुरू झाले. त्यांच्यावर पैसेही उधळण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार अपूर्व हिरे, सिडकोतील शिवसेनेसह अन्य पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. 

दरम्यान, हिरे यांच्या उपस्थितीत छमछम नृत्य झाल्याने ते अडचणीत आले आहेत. या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. केवळ 10 मिनिटांसाठी आपण तेथे उपस्थित होतो. कार्यक्रमात दीपप्रज्वलन केले, तसेच काही हिंदी भाषिक मान्यवरांचा सत्कार केला व मनोगत व्यक्‍त करून निघून गेलो. पुढे नेमके काय झाले, याची आपल्याला कल्पना नसल्याचे आमदार हिरे यांनी यासंदर्भात सांगितले. कार्यक्रमात अश्‍लील नृत्य झाल्याचे नंतर कळले. या प्रकाराचा आपण धिक्कार करतो, असेही आमदार हिरे म्हणाले.