Wed, Jul 17, 2019 18:00



होमपेज › Nashik › भिडे गुरुजींच्या शोधार्थ मनपा पाठविणार प्रतिनिधी

भिडे गुरुजींच्या शोधार्थ मनपा पाठविणार प्रतिनिधी

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:42PM



नाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या वैद्यकीय विभागाने संभाजी भिडे गुरुजी यांना बजावलेल्या नोटिसीला अद्याप उत्तर आले नाही, यासंदर्भात पोस्ट खात्याला विचारणा केल्यानंतर तेथूनही मनपाच्या हाती काहीच पडले नाही. यामुळे आता भिडे गुरुजींच्या भेटीला वैद्यकीय विभागाच्या प्रतिनिधीलाच पाठविण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. आता या प्रतिनिधीची भिडे गुरुजी भेट घेतात की नाकारतात, यावरच पुढील चौकशी अवलंबून आहे.  

मनपाच्या वैद्यकीय विभागाने बजावलेली नोटीस शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांना मिळाली की नाही, याबाबतची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय विभागाने मागील आठवड्यात पोस्ट खात्याला पत्र दिले होते. कारण पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही भिडे यांच्याकडून मनपाला नोटिसीचा खुलासा प्राप्‍त झालेला नाही. नोटीस बजावल्यानंतर सात दिवसांत मनपाने भिडे यांच्याकडून नाशिक येथील जाहीर सभेत केलेल्या वादग्रस्त विधानाचा  खुलासा मागितला होता. नाशिक येथे झालेल्या सभेत भिडे गुरुजींनी ‘माझ्या बागेतील आंबा खाणार्‍या जोडप्यांना मुले होतात. मुलगा हवा असल्यास मुलगाच होतो’, असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात गणेश बोर्‍हाडे यांनी भिडे यांच्याविरुद्ध वैद्यकीय विभाग तसेच आरोग्य संचालकांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती.

त्यावर आरोग्य विभागाने मनपाच्या वैद्यकीय विभागाने भिडे गुरुजींच्या त्या वादग्रस्त चित्रफितीची तपासणी करून त्यांना मागील महिन्यात  19 जून रोजी नोटीस बजावली होती. नोटीस देऊन 15 दिवस उलटले आहे. तरी अद्याप भिडे गुरुजी यांच्याकडून मनपाला काहीही खुलासा प्राप्‍त झालेला नाही की पोस्ट खात्याकडून मागविलेली माहितीही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आता वैद्यकीय विभागाने भिडे गुरुजी यांच्या पत्त्यावर प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता नोटीस बजावण्यासाठी भिडे गुरुजींचा पत्ता शोधणार्‍या मनपा वैद्यकीय विभागाला भिडे गुरुजी प्रत्यक्ष तरी गवसणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी वैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी आणि पीसीपीएनजीटीचे डॉ. प्रशांत शेटे करीत आहेत. नोटिसीचे उत्तर मिळत नसल्याने ही चौकशीही थंड बस्त्यात पडली आहे. या समितीकडून गर्भलिंग निदान नियंत्रण कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे.