Mon, Mar 25, 2019 03:09
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › घोटाळा उघड करणार्‍या महेश झगडे यांची बदली

घोटाळा उघड करणार्‍या महेश झगडे यांची बदली

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Mar 01 2018 12:03AMनाशिकरोड :  वार्ताहर

त्र्यंबकेश्‍वरमधील 200 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणणारे नाशिकचे विभागीय महसूल आयुक्‍त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.  झगडे यांच्या जागेवर पुणे येथील तांत्रिक विभागाचे महासंचालक राजाराम माने यांची बदली करण्यात आली आहे.

माने हे गुरुवारी (दि.1) पदभार स्वीकारणात असून, झगडे देखील गुरुवारीच प्रधान सचिव पदावर रुजू होणार आहे. विभागीय महसूल आयुक्‍त पदाची धुरा संभाळताना झगडे यांनी पाच जिल्ह्यातील महसूल विभागातील अनेक गैरकारभार, घोटाळे उघड केले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थानच्या 75 हेक्टर जागेचा घोटाळा आहे. सुमारे दोनशे कोटींचा घोटाळा घडण्यामागे तत्कालीन अधिकारी , कर्मचारी, तसेच काही राजकीय व्यक्‍तींचा समावेश होता. याप्रकरणाची झगडे यांनी चौकशी केली होती. यात काही संशयितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली असून , काहींवर लवकरच कारवाई केली जाईल, असे संकेत खुद्द झगडे यांनी दिले होते.पुन्हा असा घोटाळा घडू नये, प्रशासनाची दिरंगाई हेच मुख्य कारण त्र्यंबकेश्‍वर येथील घोटाळ्यामागे असल्याचे झगडे यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी मंत्रालयाकडे पाठविलेल्या अहवालाकडे सर्वांच लक्ष लागले होते. त्या आधारावर विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाली होती. आयुक्‍त झगडे यांना अचानक बढती देण्यामागे त्र्यंबकेश्‍वर येथील प्रकरणाचा काही संबंध असू शकतो. अशी चर्चा बांधकाम क्षेत्रात केली जात आहे. याप्रकरणी आयुक्‍त झगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.