Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Nashik › एकलहर्‍याचे तीन संच सुरू होणार

एकलहर्‍याचे तीन संच सुरू होणार

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:40AMनाशिकरोड : वार्ताहर

एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रामधील 210 मेगावॉटच्या तीन संचांच्या नूतनीकरणासाठी राज्याचे ऊर्जा सचिव अरविंद सिंग यांनी हिरवा कंदील दिला. सोमवारी  (दि.30) एकलहरे केंद्राचे मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या संयुक्‍त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंग यांच्या निर्णयाने प्रकल्पाला पंधरा वर्षे जीवदान मिळणार आहे.

बैठकीला केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निकारे, उपमुख्य अभियंता सुनील इंगळे, उपमुख्य अभियंता राकेश टमटमकर, महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर यांच्यासह सतीश पाटील, अशोक निकम, दिलीप चव्हाण, प्रशांत पाटील, चंद्रकांत बढे, संतोष जायगुडे, सुधीर बढे आदी उपस्थित होते. राज्यात सातऔष्णिक वीज केंद्र आहेत. यापैकी भुसावळ येथे 500 मेगावॉटचा एक, 600 मेगावॉटचेदोन, पारस येथे 250 मेगावॉटचे दोन, खापरखेडा येथे 500 मेगावॉटचे तीन, कोपर्डी येथे 600 मेगावॉटचे तीन, चंद्रपूर येथे 500 मेगावॉटचे तीन, तर परळी येथे 250 चे चार संच सुरू आहेत.

यामध्ये अनेक नवीन संच यंदाच्या वर्षात सुरू झालेले आहेत. मात्र, एकलहरे येथे प्रस्तावित 660 मेगावॉटचा प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे अडचणीत असून, तो सुरू होईल किंवा नाही, याविषयी साशंकता आहे. एकलहरे केंद्रातील 140 मेगावॉटचे दोन संच यापूर्वीच बंद पडले असून, सद्यस्थितीत सुरू असलेले 210 मेगावॉटचे संच शेवटच्या घटका मोजत आहेत. गुजरात राज्यातील उणई केंद्राप्रमाणे एकलहरे केंद्रातील तीन संचांचे नूतनीकरण झाले. तर किमान पंधरा वर्षे प्रकल्पाला जीवदान मिळू शकते, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रक्टर असोसिएशन तसेच एनटीपीएस संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर यांनी मांडली.

एकलहरे केंद्रातील प्रशासनानेदेखील बैठकीत सकारात्मक बाजू मांडल्याने ऊर्जा सचिव अरविंद सिंग यांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना केली. येथील वीजनिर्मिती केंद्राकडे जमीन, पाणी, कर्मचारी, स्टाफ क्वार्टर आदी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील इतर औष्णिक वीज केंद्राला नव्याने प्रकल्प सुरू करण्याकरिता जमीन खरेदी करावी लागली. तेथील प्रकल्प निर्मितीच्या खर्चात वाढ झाली. त्यामुळे येथील 660 चा प्रकल्प सुरू करण्यास हरकत नाही, असा मुद्दा असोसिएशनने मांडला.