Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Nashik › जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने दोघे बडतर्फ

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने दोघे बडतर्फ

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:11AMनाशिक : प्रतिनिधी

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने दोन कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई सोमवारी (दि.10) केली. त्याचबरोबर इंधन खरेदीत अपहार करणार्‍या वाहनचालकाची विभागीय चौकशी पूर्ण होऊन त्याच्यावर देखील कारवाई प्रस्तावित केली असून, महापालिकेची फसवणूक करणार्‍या एका महिला सफाई कर्मचार्‍यास निलंबित करण्यात आले आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने एकीकडे नाशिक जिल्ह्यासह विविध ठिकाणच्या लोकप्रतिनिधींवर गंडांतर आलेले आहे तर दुसरीकडे याचप्रकरणी शासकीय कर्मचार्‍यांची सेवा देखील धोक्यात आली आहे. महापालिकेतील वाहनचालक अशोक दिनकर दळवी आणि बिगारी यशोदा गंगाराम जाधव असे बडतर्फ केलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. महापालिकेत सेवेवर रूजू झाल्यापासून संबंधितांनी प्रमाणपत्रच सादर केले नाही. याबाबत मनपाने त्यांना अनेकदा सूचना करूनही त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही की त्याबाबतचे प्रकरणही संबंधित समितीकडे सादर केल्याचा पुरावा सादर केला नाही. शासनाने देखील दोन्ही कर्मचार्‍यांना 30 सप्टेंबर 2013 ही अंतिम मुदत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. त्यानंतरही संबंधित दळवी व जाधव हे प्रमाणपत्र हजर करू शकले नाही. यामुळे प्रशासनाला त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई करावी लागली. त्याचबरोबर एका ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकास आणि महापालिकेचीही फसवणूक करून गृहकर्ज लाटल्याप्रकरणी प्रशासनाने सफाई कर्मचारी संत्रा बहोत या महिला कर्मचार्‍यास निलंबित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासन विभागाचे उपायुक्‍त महेश बच्छाव यांनी माहिती दिली.