Thu, Apr 25, 2019 07:53होमपेज › Nashik › घरपट्टी वसुली न झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात

घरपट्टी वसुली न झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 04 2018 11:26PMनाशिक : प्रतिनिधी

मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आता घरपट्टी विभागातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना आपल्या वेतनावरही पाणी सोडावे लागणार आहे. कारण दिलेले उद्दिष्ट वसूल झाले नाही तर प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या वेतनातूनच मालमत्ता कर वसूल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता कर्मचारी करवसुली कशी करावी अशा विवंचनेत पडले आहे.

घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसंदर्भात आता मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे दर शनिवारी आढावा बैठक घेणार आहेत. त्याबाबत पहिली बैठक शनिवारी (दि.4) सकाळी झाली. बैठकीला मुख्य लेखा अधिकारी सुहास शिंदे, मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव, कर विभागाचे उपायुक्‍त डोईफोडे, सहाही विभागांचे विभागीय अधिकारी तसेच मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक आणि सहायक अधीक्षक हे उपस्थित होते. 2018-19 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्‍तांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी या दोन्हींवर अधिक जोर देत तीनशे ते साडेतीन कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मालमत्ता करातून मनपाला 120 कोटींपर्यंत महसूल मिळणे अपेक्षित आहे. परंतु, दरवर्षी केवळ 75 ते 80 कोटींपर्यंत मजल गाठली जाते. यावर्षी मालमत्ता करातील वाढ तसेच करयोग्य मूल्य दरवाढ आणि मालमत्ता सर्वेक्षणात आढळून आलेल्या 60 हजार मिळकतींवर लावण्यात आलेला करामुळे हेच उद्दिष्ट 120 हून थेट 250 कोटींपर्यंत गाठायचे आहे. तसेच पाणीपट्टीतही वाढ करण्यात येऊन त्यातून 50 कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने ठेवली आहे. आता वाढलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने विचार केला तर तीनशे कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आजमितीस मालमत्ता करातून 66 कोटींची वसुली झाली आहे.

अद्याप मोठा पल्ला प्रशासनाला गाठायचा आहे. त्यातही करयोग्य मूल्य दरवाढीचा आदेश क्रमांक 522 आणि नवीन मिळकतींवरील कर आकारणीचा आदेश क्रमांक 1234 हे दोन्ही आदेश महासभेने रद्द केल्याने त्याविषयीचा पेच अद्याप बाकी आहे. यामुळे या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बिल वाटप नेमके कोणत्या आधारावर आणि कशी करायची आणि त्यानंतर वसुली कशी करायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

45 कोटींची थकबाकी 

जुने बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातून जवळपास 40 ते 45 कोटींची येणी बाकी आहे. याच वसुलीकरिता मागील आर्थिक वर्षात प्रशासनाने थकबाकीदारांच्या मालमत्तेसमोर ‘ढोल बजाओ’ उपक्रम राबविला होता. तसेच बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या मालमत्ता जप्‍त करत जाहीर लिलावही आयोजित करण्यात आले होते. मनपाच्या या कारवाईमुळे थकबाकीदारांना घाम फुटून त्यांनी थकबाकी मनपाच्या तिजोरीत जमा केली होती. यामुळे थकबाकी वसुली होण्यास मोठा हातभार लागला होता.