नाशिक :
भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहायक पदासाठीच्या 8301 जागांसाठी महाभरती होणार असून, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जागा भरल्या जात आहेत. कोणत्याही विद्याशाखेच्या उमेदवाराला या जागेसाठी अर्ज करता येणार आहे.
पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरही जगातील 50 मोठ्या बँकांमध्ये समावेश असलेली भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वांत मोठी बँक आहे. बँकेच्या 24 हजारांपेक्षा जास्त शाखा व 69 हजारांपेक्षा जास्त एटीएम आणि दोन लाख 78 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या देशाच्या बँकिंग व्यवहारात 22 टक्के हिस्सा स्टेट बँकेचा आहे. बँकेचा कारभार 37 देशांमध्ये पसरलेला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली कर्मचारी निवृत्ती व बँकेचा वाढता विस्तार यामुळे बँकेला कुशल मनुष्यबळाची गरज आहे.
त्यामुळे बँकेकडून ज्युनिअर असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाते.स्टेट बँकेने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली असून, 20 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना बँकेच्या www.sbi.co.in या संकेतस्थळावर 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यासाठी येत्या मार्च-एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा होणार आहे, तर मुख्य परीक्षा ही मेमध्ये होणार आहे.
बँकेने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच काढलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये गेल्या वेळच्या तुलनेत मोठे बदल केले आहेत. पूर्व परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी या विषयांसाठी स्वतंत्र वेळ देण्यात आल्या आहे. मुख्य परीक्षेसाठी मात्र आधीपासूनच गणित, बुद्धिमत्ता चाचणी,इंग्रजी आणि सामान्यज्ञान घटकाला स्वतंत्र वेळ देण्यात येतो.
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना येणार्या अडचणी लक्षात घेऊन नाशिकमधील संकल्प एज्युकेशनतर्फे शालिमार येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात येत्या रविवारी (दि.28) सकाळी 11 ते 2 या वेळेत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन, संदर्भ पुस्तके याबाबत प्रा. आकाश जाधव व प्रा. ज्ञानदेव वराडे हे मार्गदर्शन करणार आहेत.