Sun, Aug 18, 2019 15:21होमपेज › Nashik › ..यापेक्षा ब्रिटिश राजवट परवडली!

..यापेक्षा ब्रिटिश राजवट परवडली!

Published On: Aug 01 2018 1:29AM | Last Updated: Jul 31 2018 10:49PMनाशिक : रावसाहेब उगले

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. या बलिदानाच्या गाथा आजही ऐकल्या की ब्रिटिश राजवटीविषयी चीड निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मात्र, स्वातंत्र्यानंतरही सध्याच्या व्यवस्थेकडून होणार्‍या त्रासामुळे ‘..यापेक्षा ब्रिटिश राजवट परवडली!’ असे म्हणण्याची वेळ निफाड तालुक्यातील उमाजीनगरवासीयांवर आली आहे. ‘पुढारी’कडे आपल्या भावना व्यक्‍त करताना ही उद्विग्‍नता त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होती.

विमान निर्मितीमुळे जगाच्या नकाशावर चमकणार्‍या नाशिकमधील ओझर आणि सय्यदपिंप्रीच्या सीमेवरील उमाजीनगरवासीयांची स्वातंत्र्यानंतरही उपेक्षा आहे. वीज आणि पाणी या महत्त्वाच्या सुविधाही येथे पोहचू शकलेल्या नाहीत. या वस्तीवरचे भयाण वास्तव पाहिल्यावर या नागरिकांचा जन्मच जणू हालअपेष्टा सहन करण्यासाठी झाला आहे की काय, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. 

500 ते 600 लोकसंख्या असलेल्या या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप बसविण्यासही विरोध होत असेल तर यासारखी लाजिरवाणी बाब नाही. देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी सर्वांना मिळावे, यासाठी केलेला सत्याग्रह आजही लोकप्रतिनिधी आपल्या भाषणांमधून केवळ सांगतच आले आहे. प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींना याविषयी कुठलीही आपुलकी नाही, हेच या नागरिकांच्या समस्या पाहून जाणवते.

..येथे चोरून करावे लागतात अंत्यसंस्कार

एरवी गावात एखाद्या व्यक्‍तीचे निधन झाल्यानंतर आख्खं गाव जमा होऊन त्या व्यक्‍तीला निरोप देतं. मात्र, उमाजीनगरात मात्र त्याउलट परिस्थिती आहे. इथे एखाद्या व्यक्‍तीचे निधन झाल्यानंतर ही बाब नातेवाईक वा गावाला सांगण्यापेक्षा आता अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्‍न त्यांना सतावतो. कारण, येथे स्मशानभूमीच नसल्याने अशाप्रसंगी जवळच्या ओझर आणि सय्यदपिंप्री या दोन्ही गावांतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जावे लागते. मात्र, तेथील ग्रामस्थांच्या विरोधामुळे उमाजीनगरवासीयांना चोरून अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

पाण्याच्या मोबदल्यात मजुरी करण्याची अट

उमाजीनगरमध्ये एकच हातपंत असून, तो पुरेसा नाही. त्यामुळे नागरिकांना शेजारच्या शेतकर्‍यांकडे पाणी भरण्यासाठी जावे लागते. मात्र, अनेकदा पाणी देतो पण त्या बदल्यात आमच्याकडे कामाला या, अशी अट घातली जाते. त्यामुळे नागरिकांना विनामोबदला शेतीकाम करावे लागते. या भयाण वास्तवाकडे एकाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही, ही बाब निश्‍चितच प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणांचे वाभाडे काढण्यासारखी आहे.

पडक्या शेडमध्ये भरते

शाळाउमाजीनगरातील मुलांना शाळा काय असते, हे याचवर्षी समजले. कारण, दोन शिक्षिकांनी येथील पडक्या शेडमध्ये शिकवणीचे वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. अल्पशा मोबदल्यावर शिकवणी घेऊन या शिक्षिकांनी आधुनिक युगातील सावित्रीबाई फुलेंचीच भूमिका निभावण्याचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणवून घेणार्‍या निफाड तालुक्याने आतापर्यंत अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्तूंग व्यक्‍तीमत्त्वे घडवली. त्याच तालुक्यात असेही एक उपेक्षित नगर असावे, यावर कोणाचाही सहजासहजी विश्‍वास बसणार नाही, हेही तितकेच खरे!