Fri, Apr 26, 2019 09:44होमपेज › Nashik › प्रा. कदम, ढगे व जाधव यांचे अर्ज दाखल

प्रा. कदम, ढगे व जाधव यांचे अर्ज दाखल

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:19AMनाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यत्वासाठी नाशिकमधून प्रा. रवींद्र कदम यांच्यासह विद्यमान सदस्य सुनील ढगे व राजेंद्र जाधव यांचे अर्ज गुरुवारी (दि. 18) दाखल करण्यात आले. गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती; मात्र ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने नाशिकमधून नेमके किती अर्ज दाखल झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. संबंधित तीनच अर्ज दाखल झाले असल्यास या तिघांची बिनविरोध निवड होणार आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची निवडणूक होत असून, प्रारंभी नियामक मंडळ सदस्यांची निवड केली जाणार आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर राज्यभरातून 60 सदस्य निवडून येणार आहेत. त्यांतून मध्यवर्ती शाखेची कार्यकारिणी निवडली जाणार आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातून 2, नगर जिल्ह्यातून 1 व जळगाव जिल्ह्यातून 1 असे उत्तर महाराष्ट्रातून 4 सदस्य नियामक मंडळावर होते.

मात्र, नव्या घटनेनुसार आता नाशिक शाखेतून 3, नगर-संगमनेर-शेवगाव मिळून 2 व धुळे-जळगाव-मुक्‍ताईनगर शाखा मिळून 2 असे एकूण 7 नियामक मंडळ सदस्य निवडले जाणार आहेत. पैकी गुरुवारी (दि. 18) अखेरच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याकडे नाशिकमधून तीन अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यांत नाशिक शाखेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे व राजेंद्र जाधव यांचा समावेश आहे. पैकी ढगे व जाधव हे नियामक मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी हेदेखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे वृत्त होते; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.