Thu, Jun 27, 2019 18:26होमपेज › Nashik › रेशन दुकानदार पुन्हा लढ्याच्या तयारीत

रेशन दुकानदार पुन्हा लढ्याच्या तयारीत

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:09PMनाशिक : प्रतिनिधी

पाइन्ट ऑफ सेल (पीओएस) मशिन्स्मध्ये येणार्‍या अडचणी, आधार सक्ती तसेच, शासन दरबारी प्रलंबित मागण्यांवर विचारमंथन करण्यासाठी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने रविवारी (दि. 25) बैठक बोलविली आहे. जुन्या मुंबई-आग्रा कालिका मंदिराच्या सभागृहात होणार्‍या बैठकीत लढ्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 

स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील दोन हजार 609 दुकानांमध्ये पीओएस मशिन्स् कार्यान्वित केले. मात्र, या मशिनमध्ये तांत्रिक दोष असल्याच्या तक्रारी दुकानदारांनी केल्या. या तक्रारींनंतर पुरवठा विभागाने प्रत्येक तालुक्यात एक तांत्रिक सल्लागार नेमला. परंतु, आजही अनेक दुकानदारांना मशिन्स् हाताळताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मशिन्स् बदलून देण्याची मागणी दुकानदारांकडून वारंवार केली जात आहे. पण या मागणीकडे विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दुकानदारांनी आता पीओएस विरोधात लढा उभारण्याची तयारी केली आहे.

येत्या 1 तारखेपासून आधारवर रेशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु, आजही अनेक लाभार्थ्यांचे आधार लिकिंग करणे बाकी आहे. त्यामुळे हा निर्णय राबवितांना दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या तसेच, काम करताना येणार्‍या अडचणींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते आहे. बैठकीत मागण्यांबाबत सरकारला अल्टिमेटम दिला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपल्या न्याय-हक्कांसाठी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी यापूर्वी विविध आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. गतवर्षी दोन वेळेस बेमुदत कामबंदचे हत्यार उपसले होते. परिणामी सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली होती. सरकारने त्यावेळी मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन देत संप मागे घेण्यास दुकानदारांना भाग पाडले होते. दरम्यान, वर्षभरानंतरही आश्‍वासनांची पूर्ती न झाल्याने रविवारी होणार्‍या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.