Sun, Aug 25, 2019 19:15होमपेज › Nashik › रेशन दुकानदारांचा आज संप

रेशन दुकानदारांचा आज संप

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:35PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात आधारकार्ड क्रमांक रेशन दुकानाशी लिंक करण्याच्या कारणावरून रेशनकार्ड धारकाने दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवारी (दि.15) एकदिवसीय संपाचे हत्यार उपसले आहे. संपकाळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

पुरवठा विभागाने स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत आणली आहे. प्रत्येक कार्डधारकाला महिन्याकाठी पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन्स्द्वारे धान्य वितरण केले जात आहे. या प्रणालीसाठी आवश्यक असलेले आधार रेशनकार्डशी लिंक करण्याची जबाबदारी पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांवर सोपविली आहे. या कामासाठी पुरवठा विभागाकडून दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप यापूर्वी  दुकानदारांनी केला होता. 

आधारसक्तीबाबत पुरवठा विभागाचा दबाव आणि सर्वसामान्य नागरिकांचा रोष अशा दुहेरी कोंडीत दुकानदार सापडले आहेत. अशातच वाशिममध्ये आधार सक्तीवरून रेशन लाभार्थ्याकडून दुकानदाराला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच दोन हजार 609 दुकानदारांनी सोमवारी एकदिवसीय संप पुकारला आहे. संपकाळात दुकाने बंद ठेवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्यासह महेश सदावर्ते, गणपत डोळसे-पाटील, दिलीप तुपे, सलीम पटेल आदींनी दिली आहे.