होमपेज › Nashik › सुरक्षारक्षकांचे रामकुंडात आंदोलन

सुरक्षारक्षकांचे रामकुंडात आंदोलन

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:48PMपंचवटी : वार्ताहर 

नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरी नदीपात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना प्रशासनाने अचानक कार्यमुक्त केल्याने संतप्त झालेल्या 95 सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी (दि.1) रामकुंडात उतरून आंदोलन केले. 

गोदावरी नदीपात्रात होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेनुसार उच्च न्यायालयाने प्रदूषण थांबविण्यासाठी मनपाला उपाययोजनेचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाने वर्षभरापूर्वी नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामार्फत रामकुंड ते तपोवन दरम्यान, नदीपात्राची सुरक्षा करण्यासाठी तसेच, नदीपात्रात कोणी निर्माल्य, घाण, कचरा टाकू नये, यासाठी कंत्राटी पद्धतीने 95 सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. या सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याची नोटीस सर्व सुरक्षारक्षकांना अचानक देण्यात आली. जिवाची पर्वा न करता अनेकांना जीवदान दिले, प्रामाणिकपणे सेवा बजावली, त्यातच नियमित वेळेवर पगार नाही असे असतांना प्रशासनाने कार्यमुक्त करून अन्याय केल्याची भावना व्यक्त करून महिला व पुरुष सुरक्षारक्षकांनी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. 

या आंदोलनाची दखल महानगरपालिकेने न घेतल्यास यापुढे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.याबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन कामगार आयुक्तांना देखील देण्यात येणार असल्याचे यावेळी सुरक्षारक्षकांनी सांगितले.

प्रदूषणमुक्ती ‘रामभरोसे’च 

अधिक महिना असल्याने काही दिवसांपासून शेकडो भाविक रामकुंडावर धार्मिक विधी व स्नान करण्यासाठी येत आहेत. मनपाच्या वतीने गुरुवारी सुरक्षारक्षकांना कार्यमुक्त करून गोदावरीची सुरक्षा पोलिसांच्या हाती सोपविण्याची तयारी करून पालिकेच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला असला तरी सध्या गोदावरी नदीपात्र व परिसराची सुरक्षा रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.