Thu, Apr 25, 2019 08:14होमपेज › Nashik › आ. राम कदम यांच्या वक्‍तव्याचा तीव्र निषेध

आ. राम कदम यांच्या वक्‍तव्याचा तीव्र निषेध

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:36PMनाशिक : टीम पुढारी

भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी मुंबईमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबद्दल केलेल्या बेताल वक्‍तव्याचे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, राज्यात ठिकठिकाणी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नाशिकमध्येदेखील काही राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्‍त केला. शहर काँग्रेसतर्फे आ. कदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने कडक शब्दात समाचार घेतला असून, हातात तलवार घेऊन कदम यांचा चौरंग करू,  त्यांनी एखादी मुलगी पळवून दाखवावी, असे खुले आव्हान दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाने ‘जोडे मारो’ आंदोलन करत आ. कदम यांचा राजीनामा व हकालपट्टीची मागणी केली आहे. छत्रपती सेनेने पंचवटीमध्ये आ. कदम यांच्या प्रतिमेला चिखल फासून निषेध नोंदविला आहे. यावेळी आ. कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.