Sun, Aug 18, 2019 15:19होमपेज › Nashik › ‘प्रबोधिनी’च्या संस्थापक रजनी लिमये कालवश

‘प्रबोधिनी’च्या संस्थापक रजनी लिमये कालवश

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 16 2018 11:00PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मानसिक अपंग, विशेष मुलांसाठी आपले अवघे आयुष्य झोकून देणार्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा रजनी नागेश लिमये (81) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मानसिक अपंगांसाठीच्या चळवळीचा आधारवडच हरपल्याची भावना व्यक्‍त होत आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून लिमये आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी दुपारी 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यांच्या पश्‍चात पती नागेश, मुलगा गौतम, मुलगी गीतांजली हत्तंगडी (पुणे), बहीण तथा ज्येष्ठ लेखिका  डॉ. विजया वाड, भाची तथा अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्यासह प्रबोधिनी संस्थेचा मोठा परिवार आहे. ठाणे येथे 1 मे1937 रोजी जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या रजनी दातीर यांनी एमए (संस्कृत) बी. एड्.पर्यंत शिक्षण घेतले. सन 1958 मध्ये त्यांचा विवाह नाशिक येथील नागेश लिमये यांच्याशी झाला. मुलगा गौतम मानसिक अपंग असल्याने त्यांना विशेष मुलांच्या समस्यांची जाणीव झाली. सन 1977 मध्ये त्यांनी नाशिकमध्ये मानसिक अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या प्रबोधिनी विद्यामंदिराची स्थापना केली व त्यानंतर संपूर्ण आयुष्य मानसिक अपंग व्यक्‍तींचे जगणे सुसह्य करण्यासाठी झोकून दिले. लिमये यांच्या निधनामुळे शहरातील सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली. वृत्त कळताच त्यांच्या स्नेह्यांनी हॉस्पिटल, प्रबोधिनी विद्यामंदिरात गर्दी केली होती. लिमये यांचे पार्थिव दुपारी 3.30 नंतर काही काळ प्रबोधिनी विद्यामंदिराच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला असल्याने अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. सायंकाळी त्यांचे पार्थिव रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले.