Sun, Jul 21, 2019 16:26
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › राजेबहाद्दर, सुविचार रुग्णालयाचे सोनोग्राफी मशीन सील

राजेबहाद्दर, सुविचार रुग्णालयाचे सोनोग्राफी मशीन सील

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 1:37AMनाशिक : प्रतिनिधी 

महापालिका आरोग्य विभागाने शहरातील नेहरू गार्डन येथील राजेबहाद्दर रुग्णालय व नाशिक पुणे महामार्गावरील नासर्डी पुलानजीक असलेले सुविचार हॉस्पिटलमधील इको 2-डी करणारे सोनोग्राफी मशीन सील केले आहे. मशीनमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे खासगी रुग्णालयातील मनमानी कारभाराचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

महापालिकेकडून रुग्णालयांची तपासणी व नोंदणी करण्याची मोहीम सुरू आहे. या अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राजेबहाद्दर रुग्णालय व सुविचार रुग्णालयाची तपासणी केली. त्यात या दोन्ही रुग्णालयांतील इको टू डी करणार्‍या सोनोग्राफी मशीनमध्ये काही त्रुटी आढळल्या. तसेच, काही रुग्णांकडून याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने दोन्ही ठिकाणी सोनोग्राफी मशीनची तपासणी केली गेली. त्यात त्रुटी आढळल्याने सोनोग्राफी मशीन सील करण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान, आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी येत्या 31 मे पूर्वी शहरातील रुग्णालयांनी आरोग्य विभागाकडे नोंदणी करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र, रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे रुग्णालय चालकांचे धाबे दणाणले आहेत. चेंज ऑफ यूज किंवा कम्पाउंडिंग स्ट्रक्‍चर्स हे दोन पर्याय सध्या शहरातील अनधिकृत खासगी रुग्णालयांसमोर महापालिकेने ठेवले आहेत. यामुळे खासगी रुग्णालय चालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. शहरात एकूण 584 रुग्णालये आहेत. त्यापैकी मंगळवार (दि.15)पर्यंत 313 रुग्णालयांनी नोंदणी पूर्ण केली आहे. 271 रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया बाकी आहे. आयुक्‍त मुंढे यांनी अल्टिमेटम दिल्याने रुग्णालय नोंदणीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.