होमपेज › Nashik › विकास करूनही मते नाहीत

विकास करूनही मते नाहीत

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

मनसेकडून नाशिक शहरात अनेक विकासाची कामे झाली. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाची मोठी कामे केली. मात्र, दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीत पराभूत झाले. यामुळे विकासकामे करून मतदार मत देतात यावर आपला विश्‍वासच राहिला नाही. अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सोमवारी (दि.3) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार आणि पक्षाच्या काही ज्येष्ठ पदाधिकार्‍यांशी ते बोलत होते.

येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला लोक जागा दाखवतील. निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असे सूतोवाच राज यांनी केले. राज म्हणाले की, विकासाची अनेक कामे नाशिक शहरात केली. अन्य शहरांमध्ये फिरताना त्याची जाणीव होते. त्याच कामांवर सध्याचे सत्ताधारी आयती प्रसिद्धी करत आहेत. आपल्याला पराभवाची खंत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही असे आज बोलले जाते. खरे तर ही लोकांची नव्हे, तर भाजपाचीच भाषा आहे. आपण थोडे इतिहासात डोकावले तर लालबहाद्दूर शास्त्री, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना देखील पर्याय मिळालच ना. राजीव गांधी यांना 1984 मध्ये मोठे बहुमत मिळाले. परंतु, 1989 मध्ये त्यांचा पराभव झाला त्याचे काय? यामुळे येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी कितीही क्लृप्त्या वापरल्या तरी त्यांचा पराभव होणारच, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. त्याचे उदाहरण म्हणून गुजरात राज्याचा निकाल पहावा.

2014 च्या मतदानानुसार भाजपाचे 165 आमदार निवडून यायला पाहिजे होते. प्रत्यक्षात शंभरही आले नाहीत. एकटे राहुल गांधी मोदींच्या विरोधात प्रचाराला उतरले होते आणि त्यांच्या विरोधात संपूर्ण भाजपा अन् नरेंद्र मोदी. 2019 मध्ये हेच होईल. भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, माजी आमदार नितीन भोसले, शहरप्रमुख अनिल मटाले आदी उपस्थित होते. विदर्भ जर स्वतंत्र झाला तर तिथे अमराठी लोकांच्या हाती सत्ता जाईल, असा धोकाही त्यांनी बोलून दाखविला.