Thu, Jul 18, 2019 17:01होमपेज › Nashik › अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस पावसाचा अडथळा

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस पावसाचा अडथळा

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी 

शहरातील अनधिकृत बांधकामे येत्या 31 मेपर्यंत शासन धोरणानुसार नियमित करून न घेतल्यास त्यावर हातोडा चालविण्यात येईल, अशी ताकीद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली खरी; मात्र रहिवासी इमारतींवर पावसाळ्यामध्ये कारवाई करू नये, असा शासन नियम आहे. एवढेच काय तर साधी अतिक्रमण निर्मूलन मोहीमसुद्धा राबवता येत नाही. विशेष म्हणजे आयुक्त मुंढे हे प्रत्येक कारवाई नियमावर बोट ठेवून करतात. त्यामुळे शासन नियमाचा विचार करता इच्छा असूनही मुंढे यांना रहिवासी इमारतींच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविता येणार नाही, असे बोलले जात आहे.

नाशिक शहरात साडेसहा हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासाठी आयुक्तांनी येत्या 31 मेपर्यंत सायंकाळी 5.45 पर्यंतची डेडलाइन दिली आहे. दिलेल्या मुदतीनंतर एकही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असे सांगत 1 जूनपासून शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येतील, यावर आयुक्त मुंढे हे ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यशाळेतही त्यांनी बिल्डर लॉबीला कारवाईबाबत इशारा दिला होता. तसेच, नदीपात्र व पूररेषा, लष्कराची जागा, हरित पट्टा, बफर झोन आदी जमिनींवरील बांधकामे शासन नियमानुसार नियमित करता येणार नसून, त्यावरदेखील बुलडोझर फिरविला जाईल, असे सांगितले आहे.

या इशार्‍यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय अनधिकृत बांधकामांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक रहिवासी इमारतींचा समावेश असून, त्यामध्ये लाखो नागरिक राहतात. आयुक्तांच्या कारवाईमुळे बेघर होण्याच्या भीतीने नागरिक चिंतेत आहे. आयुक्तांनी येत्या 1 जूनपासून कारवाईचा इशारा दिला असून, हा पावसाळ्याचा हंगाम आहे. मात्र, शासन नियमानुसार पावसाळ्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविता येत नाही. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत रहिवाशांचे हाल होता कामा नये, असा नियम आहे. त्यातल्या त्यात रहिवासी इमारती अथवा वस्ती असेल तर कारवाई करण्यास सक्त मनाई आहे. शासनाचा हा नियम बघता मुंढे यांनी जरी अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा इशारा दिला असला तरी पावसाळ्यात ही कारवाई होऊ शकत नाही, अशी चर्चा आहे.