Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Nashik › नाशिकमध्ये पावसाची हजेरी

नाशिकमध्ये पावसाची हजेरी

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

अखेर शनिवारी पावसाने नाशिकमध्ये हजेरी लावली असून, नाशिककरांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. सायंकाळच्या सुमारास पडलेल्या पावसाने सुखद धक्का दिला आहे. खरिपासाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघणार्‍या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील काळजीचे ढग काही अंशी दूर झाले आहेत. 

मान्सूनचे आगनम यावर्षी दोन दिवस आधीच होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी नाशिककरांना मात्र पावसाची प्रतीक्षा होती. जून महिना अर्धा झाल्यानंतरही पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर काळजीचे ढग दाटून आले होते. खरीप हंगामातील विविध पिकांच्या सहा लाख 76 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. खरिपासाठी शेतीची मशागत करून बी-बियाणे, रासायनिक खतांचीही खरेदी करण्यात आली होती. खरीप हंगामातील पेरणीच्या दृष्टीने साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात कालपर्यंत पाऊस पडलाच नाही.

दररोज सकाळी ढगाळ वातावरण होत असले तरी पाऊस मात्र हुलकावणीच देत होता. उकाड्याने नाशिककर हैराण झाले होते. अखेर शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावून सुखद धक्का दिला. साधारणत: सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जोर नसला तरी संततधार सुरूच होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून क्षणात पाणी वाहू लागले होते. अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत होता. सकाळपासूनच पावसाचे वातावरण दिसून येत होते. दुपारी शिडकावा झाल्यानंतर सायंकाळी मात्र पावसाने चांगलेच लावून धरले होते. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने काळजीचे ढग काही अंशी दूर झाले आहेत. राज्यात इतर जिल्ह्यांत पावसाचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्ये कधी बरसणार याकडे लक्ष लागून होते.