Tue, Mar 19, 2019 12:03होमपेज › Nashik › नाशिकमध्ये धारा बरसल्या

नाशिकमध्ये धारा बरसल्या

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 11:09PMनाशिक : प्रतिनिधी 

मागील काही दिवसापसून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने बुधवारी (दि.20) दुपारी वादळी वार्‍यासह शहर व जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहर व उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. 17 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, जिल्ह्यातदेखील पाऊस जोरदार बरसला. वादळी पावसामुळे सिन्नर येथे वीज कोसळून संजय पोमनर या युवकाचा मृत्यू झाला. तर एक म्हैस ठार झाली. 

कोकण, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असली तरी उत्तर महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर नाशिककरांचे डोळे वरुणराजाकडे लागून होते. अखेर बुधवारी दुपारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्धातासात शहरात 26 मिमी इतका पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण परिसरात 21 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली. शहर व उपनगरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते.