Sun, Apr 21, 2019 14:27होमपेज › Nashik › रिक्षाचालकांपुढे रेल्वे प्रशासनाचेे लोटांगण

रिक्षाचालकांपुढे रेल्वे प्रशासनाचेे लोटांगण

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 05 2018 11:41PMउपनगर : वार्ताहर 

नाशिकरोड रेल्वे स्टेशन आवारात मध्यरात्री लावलेले बॅरिकेड्स रिक्षाचालकांच्या आक्रमकतेमुळे रेल्वे प्रशासनाला रात्रीतून काढून घेणे भाग पडले. त्यामुळे रेल्वेने रिक्षाचालकांसमोर लोटांगण घातल्याचे चित्र होते.

रिक्षाचालकांनी बॅरिकेड्सला विरोध दर्शवून जीव देण्याची धमकी दिल्यानंतर  रेल्वे प्रशासनाला माघार घ्यावी लागली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते. खासगी वाहन कंपन्यांना जागा भाड्याने देण्यासाठी रेल्वे प्रशासन हा घाट घालत आहे. त्यामुळे हा वाद आता पेटण्याची चिन्हे आहेत. याला रिक्षाचालकांनी तीव्र विरोध केला आहे.  नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात दोनशे रिक्षाचालक 40 वर्षांपासून रिक्षा व्यवसाय करत आहेत. त्यांना खासगी वाहनांच्या तीव्र स्पर्धेमुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. स्थानकातून रिक्षाचालकांना हटवून ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांना जागा देण्याचा रेल्वेचा विचार आहे. रिक्षाचालकांनी तीव्र विरोध करत रेल्वेला माघार घ्यायला लावली होती. सिन्‍नर फाटा येेथे ओला व उबेर कंपन्यांना जागा द्यावी, अशी रिक्षाचालकांची भूमिका आहे.

काल अचानक रात्री दोनच्या सुमारास रेल्वेस्थानक आवारात रिक्षा स्टॅण्डमध्ये रेल्वेने बॅरिकेड्स लावणे सुरू केले. स्थानकप्रमुख आर. के. कुठार, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण उपस्थित होते. नाशिकरोड रिक्षा चालक- मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे यांना ही घटना समजताच त्यांनी अनिल शिंदे, मोहम्मद सय्यद, रमेश दाभाडे, रामा साळवे, शिवा जाधव या रिक्षाचालकांसह घटनास्थळी धाव घेतली.. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही बॅरिकेडिंग करत असल्याचे आर. के. कुठार यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केल्यानंतररिक्षाचालकांना हटविण्यात येऊ नये, असा निर्णय झाला होता, याची आठवण किशोर खडताळे यांनीकरून दिली.