होमपेज › Nashik › कांदा उत्पादकांचा पैशांसाठी आक्रोश

कांदा उत्पादकांचा पैशांसाठी आक्रोश

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 1:18AMमालेगाव : प्रतिनिधी

तीन महिन्यांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळत नाही, धनादेशही वटत नाही आणि आडत्याही फरार झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी गुरुवारी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत  ठिय्या आंदोलन करून पैशांसाठी आक्रोश केला.  व्यापारी शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झालेली  असताना बाजार समिती प्रशासन झोपा काढते का, असा सवाल संतप्त शेतकर्‍यांनी केला.   सायंकाळी शेतकर्‍यांना पैसे वितरित केले.शेतकर्‍यांचा असंतोष कायम  असल्याने बाजार समिती आवारात बंदोबस्त होता.     

तीन महिन्यांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळत नाही, धनादेशही वटत नाही आणि आडत्याही फरार झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी गुरुवारी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत  ठिय्या आंदोलन करून पैशांसाठी आक्रोश केला.

व्यापारी शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झालेली  असताना बाजार समिती प्रशासन झोपा काढते का, असा सवाल संतप्त शेतकर्‍यांनी केला.  सभापती-उपसभापतींनी संतप्त शेतकर्‍यांशी चर्चा करून संबंधित व्यापार्‍याचा व्यवहार असलेल्या पिंपळगाव बसवंतच्या व्यापार्‍याकडून 50 लाख रुपये प्राप्त करून घेत सायंकाळी शेतकर्‍यांना पैसे वितरित केले.शेतकर्‍यांचा अंसतोष कायम  असल्याने बाजार समिती आवारात पोलिस बंदोबस्त होता.

कधी गडगडणारे बाजारभाव, अवकाळीचा फटका तर कधी व्यापार्‍याकडून फसवणूक अशा दुष्टचक्रात कांदा उत्पादक भरडत आला आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवल्याने बाजारभाव तेजीत येऊनही शेतकर्‍यांना पैशांच्या हातात त्याचा मोबदला पडलेला नाही.  मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील परवानाधारक व्यापारी जय भोले ट्रेडर्स या कंपनीने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला होता. शेकडो शेतकर्‍यांना त्यांनी एक ते दीड महिन्यानंतरचे धनादेश दिले होते. दिलेल्या तारखेवर शेतकर्‍यांनी धनादेश बँकेत जमा केले. परंतू, खात्यावर रक्कमच नसल्याने धनादेश वटले नाही. त्यापोटी उलट शेतकर्‍यांकडून बँकेने दंड वसूल केला. तक्रार करणार्‍या काही शेतकर्‍यांना   30 ते 40 टक्के रक्कम रोख अदा केली गेली. त्या-त्या वेळी उर्वरित रक्कमेसाठी दिलेला शब्द मात्र पाळला गेला नाही.

एक-दोन नव्हे तर किमान दोनशे शेतकर्‍यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आल्याने शेतकर्‍यांना मुंगसे केंद्रावर अलिकडेच आंदोलन केले. त्यानंतरही पैसे न मिळाल्याने बाजार समितीच्या सुचनेवरून कांदा उत्पादक आज मुख्य आवारात सकाळी 10 वाजेपासून ठिय्या आंदोलनासाठी जमा झाले होते. शेतकर्‍यांनी आपल्या पावत्या आणि धनादेश दाखवून सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनिल देवरे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. शेतकर्‍यांच्या वाढत्या आक्रोशामुळे कॅम्प व छावणी पोलिसांना पाचारण करावे लागले. 

अखेर जय भोले ट्रेडर्सचे संचालक शिवाजी सुर्यवंशी यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील व्यापार्‍याशी कांद्याचा एक कोटीहून अधिकचा व्यवहार केल्याची माहिती उघड झाली. सभापतींनी त्या व्यापार्‍याशी संपर्क साधून 50 लाखांची रक्कम देण्याची विनंती केली. त्यानुसार काही कर्मचार्‍यांनी दुपारी जाऊन सायंकाळी सदरची रक्कम आणली. पैसे मिळविण्यासाठी शेतकर्‍यांची एकच गलका केल्याने गोंधळ उडाला.  सायंकाळी उशिरापर्यंत पैसे वितरण सुरू होते. 

21 जानेवारीपासून रोखली बोली 

घडल्या प्रकाराविषयी माहिती देताना सभापती जाधव व उपसभापती देवरे यांनी सुर्यवंशी यांनी इतर व्यापार्‍यांच्या तुलनेत 50 ते 100 रुपयांचा अधिकाचा बाजारभाव देऊन कांदा खरेदी वाढवली. त्याविषयी शंका आल्याने त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला. परंतू, काही शेतकर्‍यांनीच आक्षेप घेतला. दि. 17 फेब्रवारीला बैठक घेत शेतकर्‍यांना पाच हजार रुपये रोख आणि उर्वरित रक्कमेचा त्याच तारखेचा धनादेश देण्याचे निर्देश दिले. 20 तारखेपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले. तत्पूर्वीच सूर्यवंशीला दि. 23 जानेवारीपासून लिलाव प्रक्रियेत बोली लावण्यास मनाई करण्यात आली होती.