होमपेज › Nashik › हलगर्जीपणा करणार्‍या परिचारिकांवर कारवाई करा

हलगर्जीपणा करणार्‍या परिचारिकांवर कारवाई करा

Published On: Aug 31 2018 1:40AM | Last Updated: Aug 30 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

परिचारिकांनी हात स्वच्छ धुवूनच नवजात शिशूला हातात घेण्याची गरज आहे. मात्र, अनेक परिचारिका त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी शिशूला संसर्गजन्य होेण्याची भीती वाढते. त्यामुळे असा हलगर्जीपणा करणार्‍या परिचारिकांवर यापुढे तत्काळ कारवाई करा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. तसेच शहर व ग्रामीण विभागात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आजार कमी करण्यासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष द्यावे, अशाही सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 30) आयोजित साथरोग व आरोग्याच्या इतर समस्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी डॉ. सावंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे आदी उपस्थित होते.

मालेगावच्या तुलनेत नाशिक शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेने याबाबत काळजी घ्यावी, असे आदेश डॉ. सावंत यांनी दिले. स्वाइन फ्लूमुळे महिनाभरात सातजणांचा मृत्यू झाल्याबद्दल डॉ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या प्रकारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य विभागाने स्वच्छतेसह जनजागृती भर द्यावा, अशा सूचनाही डॉ. सावंत यांनी दिल्या. दरम्यान, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी घरोघरी जाऊन जागृती करावी. शहरात भित्तीपत्रके, जाहिरात, पत्रके आदी माध्यमातून नागरिकांना आरोग्याचे महत्त्व सांगावे, अशा सूचनाही डॉ. सावंत यांनी दिल्या. यावेळी आरोग्यसह मनपा, जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी उपस्थित होते.