Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Nashik › ‘संदर्भ’च्या दुरवस्थेस आरोग्यमंत्रीच जबाबदार

‘संदर्भ’च्या दुरवस्थेस आरोग्यमंत्रीच जबाबदार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकमधील शालिमार येथे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, या रुग्णालयास समस्यांचा वेढा वाढलेला असून, त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी असला तरी निधी खर्च करण्यासाठी परवानगी नसल्याने रुग्णालयाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. रुग्णालयाच्या दुरवस्थेस आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे जबाबदार असल्याचा आरोप आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. 

विभागीय संदर्भ रुग्णालयात मूत्रपिंड, कर्करोग, हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या जात असतात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना चांगल्या प्रतिचे उपचार मिळत असल्याने दिलासा मिळाला. मात्र, काही महिन्यांपासून या रुग्णालयास समस्यांनी वेढले आहे. रुग्णालयातील 16 अत्यावश्यक असणार्‍या यंत्रणा नादुरुस्त असून, त्यामुळे रुग्णांना फटका बसत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातील लिफ्ट, वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्या असून, रुग्ण व नातेवाइकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांसाठी घरून फॅन आणण्याचे फर्मानही रुग्णालयीन कर्मचारी सोडत असल्याने गरीब रुग्णांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. याबाबत आ. फरांदे यांनी विधानसभेत ‘पॉइंट ऑफ ऑर्डर’ मार्फत संदर्भ रुग्णालयाचा प्रश्‍न मांडला.

त्यात आरोग्यमंत्री संदर्भ रुग्णालयाबाबत गंभीर नसल्याचा आरोप फरांदे यांनी केला. 23 मार्चला झालेल्या बैठकीतदेखील कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. संदर्भ सेवा रुग्णालयाकडे असणारे 18 कोटी रुपये खर्च करण्यास परवानगी दिली तरी रुग्णालयाचे अनेक प्रश्‍न सुटतील. मात्र, वारंवार मागणी करूनही ही रक्कम खर्च करण्यास परवानगी का दिली जात नाही असा सवाल फरांदे यांनी विधानसभेत केला. त्यानंतर फरांदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही हा प्रश्‍न मांडून संदर्भ सेवा रुग्णालयाला नियमित देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, रुग्णालयातील 16 यंत्रसामग्री बंद असल्याचे सांगितले.

तसेच रुग्णालयात कर्करोग शस्त्रक्रिया व मूत्रपिंड शस्त्रक्रिया केंद्र सुरू करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली असली तरी रुग्णालयात वाढीव दोन मजले बांधण्याच्या प्रस्तावास जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने बैठकीत अधिकार्‍यांनी चुकीची माहिती दिली. त्या अधिकार्‍यांवरदेखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा नाशिककरांना लाभ मिळू नये यासाठी आरोग्यमंत्री जाणूनबुजून उशीर करीत आहेत. रुग्णालयाचा निधी असतानाही तो खर्च करण्यास परवानगी दिली जात नसल्याने रुग्णालयातील लिफ्ट, वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्या आहेत. निधी खर्च करण्यास परवानगी दिल्यास रुग्णालयाच्या समस्या सुटतील.   - देवयानी फरांदे, आमदार

 

Tags : nashik, nashik news,Shalimar, Sandarbha Seva Rugnalaya, Problems 


  •