Tue, Jun 25, 2019 13:17होमपेज › Nashik › मनपातील गणपती मंदिरावर ‘विघ्न’

मनपातील गणपती मंदिरावर ‘विघ्न’

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:15PMनाशिक : प्रतिनिधी

मनपातील विविध विभागांतील देवी-देवतांची छायाचित्रे हटविण्याच्या कारवाईनंतर मनपा आयुक्‍तांनी बांधकाम विभागामधील गणपतीचे छोटे मंदिरही हटविले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे मग आता महापालिका गणेशोत्सव साजरा करणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाशिकची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच सर्व विभागांत फेरफटका मारून त्या-त्या ठिकाणच्या देवी-देवतांच्या प्रतिमा हटविण्याचे आदेश दिले होते. आयुक्‍तांच्या या भूमिकेमुळे कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही कर्मचार्‍यांनी आपापल्या विभागातील प्रतिमा काढून घेतल्या होत्या. त्यानंतर आयुक्‍तांनी बुधवारी (दि.27) मनपातील सार्वजनिक बांधकाम विभागातील गणपती मंदिरही हटविण्याची सूचना केली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी लगेचच हे मंदिर हटविले. याच ठिकाणी कर्मचारी दरवर्षी एकत्र येत गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करून मोठ्या भक्‍तिभावाने उत्सव साजरा करत असतात. मात्र, आता हा गणेशोत्सवही साजरा करता येणार नाही. त्याचबरोबर मनपा आवारात गणेशोत्सव काळात आरास उभी करून गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मनपा वा सरकारी कार्यालयात मूर्ती वा प्रतिमा नकोच या भूमिकेमुळे आता गणेशोत्सव काळातही गणेशमूर्तीची स्थापना होणार की नाही असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ओझर येथील एका नागरिकाने महापालिकेत काही क्रांतिकारकांच्या प्रतिमा आणून त्या आयुक्‍तांना भेट देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे संबंधित व्यक्‍तीला  कार्यालयाबाहेर रोखून बाहेर काढण्यात आले होते.